कोल्हापूर (प्रतिनिधी): कोल्हापूर जिल्ह्यातील मुरगुड येथे सापडलेला पहिला करोनाबाधित रुग्ण हा प्रशासनाने केवळ कागदोपत्री संस्थात्मक क्वारंटाईन दाखवला आहे. पण प्रत्यक्षात हा रुग्ण केवळ एकच दिवस कन्या विद्यामंदिर या शाळेमध्ये क्वारंटाईन असल्याचे पुरावे देत नागरिकांनी नगरपालिकेचे मुख्याधिकारी संजय गायकवाड यांना घेराव घातला. तसेच नागरिकांनी त्यांच्यावर चपलफेक केल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता.
करोना पॉझीटिव्ह रुग्ण सापडल्यावरुन नागरीकांनी नगरपालिका प्रशासनावर प्रश्नांची सरबती केली. यावरूनच प्रचंड गोंधळाला सुरु झाली. संतप्त नागरिकांनी काही बॅनर फाडून भिरकावले. पालिका प्रशासन नागरिकांच्या जीवाशी खेळत असल्याचा आरोप करत संपूर्ण पालिका, स्वच्छता कर्मचारी यांना क्वारंटाईन करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. यामुळे वातावरण तापल्याने अखेर पोलिसांना पाचारण करून नागरिकांना बाहेर काढण्यात आले.