मुंबई – सुपरस्टार ‘अल्लू अर्जुन’चा बहुप्रतिक्षीत ‘पुष्पा द राइज’ हा चित्रपट 17 डिसेंबरला रुपेरी पडल्यावर प्रदर्शित झाला आहे. करोना काळात सुद्धा या चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई केली आहे.
हा चित्रपट तमिळ, तेलुगू, मल्याळम, कन्नड आणि हिंदी भाषांमध्ये प्रदर्शित झाला असून, अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदन्नाची केमेस्ट्री प्रेक्षकांना चांगलीच भावली आहे. सध्या चित्रपटातील पुष्पा या पात्राच्या काही खास शैली सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतायत.
यामध्ये खांदा वाकून चालणे, पाय घसरत घसरत केलेला डान्स, दाढीवरुन हात फिरवत केलेली डायॉगबाजी, बिडी पकडण्याची स्टाइल, गॉगल उतरवण्याची स्टाइल अशा अनेक गोष्टी तरुणाईला चांगल्याच भावल्या आहेत.
सिनेमात ‘पुष्पा’ची मुख्य भूमिका साकारणाऱ्या अभिनेता ‘अल्लू अर्जुन’ला मराठी अभिनेता श्रेयस तळपदे याने दमदार असा आवाज दिला आहे. सोशल मीडियावर सुद्धा श्रेयस तळपदेच्या या कामाचे जोरदार कौतुक होत आहे. मात्र, सिनेमातील इतर पात्र म्हणजेच, श्री वल्ली, जॉली रेड्डी, केसर सिंह शेखावत आणि मंगलम श्री या कॅरेक्टरला देखील काही मराठमोळ्या कलाकारांनी आपला आवाज दिला आहे.
पुष्पा – सिनेमातील मुख्य कॅरेक्टर ‘पुष्पा’ला मराठी अभिनेता श्रेयस तळपदे याने आपला आवाज दिला असून, या सिनेमाची उंची वाढवली आहे. यापूर्वी श्रेयसने डिझनीच्या बहुचर्चित ‘द लायन किंग’ सिनेमातील ‘टिमो’ या कॅरेक्टरसाठी आपला आवाज दिला होता.
जॉली रेड्डी – पुष्पा सिनेमात ही भूमिका देखील अतिशय जबरदस्त अशी झाली आहे. ही भूमिका धनंजय यांनी साकारली आहे. हिंदी चित्रपटामध्ये धनंजय यांच्या भूमिकेला ‘मनोज पांडे’ यांनी आवाज दिला आहे.
श्री वल्ली – सिनेमात श्री वल्ली ही पुष्पाची प्रेयसी दाखवली असून, दाक्षिणात्य अभिनेत्री ‘रश्मिका मंदाना’ने ही भूमिका साकारली आहे. सिनेमात श्री वल्ली हिला ‘स्मिता रोजमे’ यांनी आपला सुंदर आवाज दिला आहे.
केसर सिंह शेखावत – केसर सिंह शेखावत ही भूमिका देखील प्रेक्षकांना खूप आवडली आहे. या भूमिकेला ‘राजेश खट्टर’ यांनी आवाज दिला आहे.
मंगलम श्री – पुष्पा या सिनेमात मंगलम श्री ही भूमिका चांगलीच गाजली आहे. प्रेक्षक सुद्धा या कॅरेक्टरचे जबरदस्त फॅन्स झाले आहे. या कॅरेक्टरला मराठमोळे अभिनेते ‘उदय सबनीस’ यांनी आपला आवाज दिला आहे.