बेलसर – पुरंदर तालुक्यातील अंजीर हे महत्त्वाचे पीक मानले जाते. त्याच अनुषंगाने अलीकडील काळामध्ये पुरंदर तालुक्यातील अंजिराला जी. आय. नामांकन मिळाल्यामुळे जगभरात पुरंदरच्या अंजीराला विशेष ओळख मिळाली आहे. त्याच निमित्ताने अखिल महाराष्ट्र अंजीर उत्पादक संघ यांच्यावतीने भैरवनाथ मंदिर, सोनोरी, (ता. पुरंदर) येथे अंजीर उत्पादक संघाचे सभासद शेतकऱ्यांना ‘पुरंदर अंजीर’ भौगोलिक चिन्हांकन / मानांकन (जी. आय.) प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले.
या प्रमाणपत्रामुळे पुरंदर तालुक्यातील सोनोरी गावातील अंजीर उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. जागतिक बाजारपेठेमध्ये पुरंदर तालुक्यातील म्हणजेच सोनोरी गावातील अंजीर हे विश्वास दर्शक व चविष्ट अंजीर म्हणून ओळखले जाईल व बाजारपेठेत त्याला महत्त्वाचे स्थान मिळेल. तसेच शेतकऱ्यांना आर्थिक नफा मिळण्यासाठी मदत होईल.
जे उत्पादक संघाचे सभासद नसतील त्यांना तांत्रिक फि- घेऊन सभासद करून घेण्यात आले. तसेच ज्या अंजीर उत्पादकांनी जी. आय. प्रमाणपत्रासाठी अर्ज केले नसतील त्यांच्याकडून जी. आय. प्रमाणपत्रासाठी अर्ज भरून घेतले. त्याचबरोबर अंजीर उत्पादकांच्या कीड व रोग व्यवस्थापनाबाबत अडचणी व समस्या समजावून घेवून त्यासंबधी युवराज बालगुडे (शास्त्रज्ञ, अंजीर संशोधन केंद्र, जाधववाडी) यांनी मार्गदर्शन केले.
सोनोरी येथील बहुसंख्य अंजीर उत्पादक शेतकऱ्यांनी उपस्थित राहून सहभाग घेतला. यावेळी अखिल महाराष्ट्र अंजीर उत्पादक संशोधन संघ, पुणेचे अध्यक्ष आप्पासो काळभोर, उपाध्यक्ष रामचंद्र खेडेकर, सचिव दिलीप जाधव, खजिनदार प्रदीप पोमण, डॉ. युवराज बालगुडे (शास्त्रज्ञ अंजीर व सीताफळ संशोधन केंद्र, जाधव वाडी, पुरंदर), सोनोरी कृषी सहाय्यक योगेश गिरासे व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.