चंदिगड – कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी पंजाबच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर मुख्यमंत्रीपदी चरणजीत सिंग चन्नी यांची वर्णी लागली आहे. चरणजीत सिंग चन्नी सलग तीन वेळा काँग्रेसचे आमदार आहेत. ते पंजाबच्या चमकौर साहिब विधानसभा मतदारसंघातून निवडून येत आहेत.
2017 मध्ये काँग्रेस सरकार सत्तेवर आल्यानंतर त्यांना अमरिंदर सिंग यांच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री करण्यात आले. अमरिंदर सिंग यांच्या राजीनाम्यापूर्वी त्यांनी तंत्रशिक्षण आणि औद्योगिक प्रशिक्षण विभाग सांभाळला. चन्नी अकाली दल आणि भाजप सरकारच्या काळात 2015 ते 2016 पर्यंत पंजाब विधानसभेत विरोधी पक्षनेते होते.
चरणजीत सिंग चन्नी रामदासिया शीख समुदायाचे आहेत. हा समुदाय दलित शीख म्हणून ओळखला जातो. रामदासिया हा शब्द सामान्यतः त्या शीखांसाठी वापरला जातो ज्यांचे पूर्वज दलित होते आणि त्यांनी शीख धर्म स्वीकारला होता. पंजाबमध्ये या समुदायाचे लक्षणीय प्रमाण (सुमारे 30 टक्के) आहे. पंजाबमध्ये काँग्रेसचा दलित चेहरा म्हणून चन्नीकडे पाहिले जाते.
चन्नी अमरिंदर सिंग यांचे विरोधक राहिले आहेत, चरणजीत सिंग चन्नी कॅप्टन अमरिंदर सिंग यांचे कट्टर विरोधक आहेत. चन्नी 2017 पासून अमरिंदर सरकारमध्ये मंत्री होते, परंतु अमरिंदर सिंग यांना विरोध करणारे आमदार त्यांच्यासोबत असल्याच्या सतत बातम्या येत होत्या. अलीकडेच, चन्नी यांनी अमरिंदर सिंग यांच्याबाबत हायकमांडवर सतत दबाव टाकला. तसेच कॅप्टन यांच्या कामकाजावर त्यांनी अनेकवेळा जाहीरपणे प्रश्नही उपस्थित केले होते.