चंदिगढ : रात्री नऊ ते सकाळी सहा या वेळेत महिला बाहेर असतील तर त्यांना घरी सुरक्षित सोडण्यासाठी मोफत पोलिस सेवा देण्यात येईल, अशी घोषणा पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदरसिंग यांनी महिलांवरील वाढत्या अत्याचाऱ्यांच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर केली.
ही सेवा 100, 112 आणि 182 क्रमांकावर फोन केल्यास ही महिला तातडीने पोलिस नियंत्रण कक्षाशी जोडली जाईल. या योजनेची अंमलबजावणी तातडीने राज्यभर करण्याचे आदेश पोलिस महासंचालक दिनकर गुप्ता यांना मुख्यमंत्र्यांनी दिले. ज्यांच्याकडे सुरक्षित वाहन नाही (रिक्षा आणि टॅक्सीसह), अशा महिलांना ही सेवा पुरवण्यात येणार आहे. त्या महिलेला सुरक्षिततेची भावना मिळण्यासाठी त्यावेळी एक महिला पोलिसही सोबत असेल, असे त्यांनी स्पष्ट केले.
पोलिस आयुक्तालयाच्या आणि मोहाली, पतियाळा, भटिंडा आणि अन्य महत्वाच्या शहरात पोलिस नियंत्रण कक्षाला वाहने उपलब्ध करून देण्यात येतील. तर सहाय्यक आयुक्त किंवा उपअधिक्षक दर्जाचा अधिकारी प्रत्येक जिल्ह्यात या योजनेच्या कामावर देखरेख ठेवेल. त्यांचे क्रमांक सरकारी आणि पंजाब पोलिसांच्या वेबसाईटवर उपलब्ध असतील. अतिरिक्त पोलिस महासंचालक गुरूप्रित देव या योजनेचे राज्याचे प्रमुख असतील, असे पोलिस महासंचालक दिनकर गुप्ता यांनी जाहीर केले.