पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – पुनीत बालन ग्रुप तर्फे आयोजित पुण्यातील गणपती मंडळ, नवरात्र मंडळ, ढोल-ताशा पथक आणि मीडिया यांंच्या संघांचा समावेश असलेल्या “फ्रेंडशिप करंडक’ क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धेच्या निमित्ताने पुणे पोलीस कल्याण निधीला पाच लाख रुपयांची देणगी देण्यात आली.
पुनीत बालन ग्रुपचे संचालक पुनीत बालन आणि माणिकचंद ऑक्सिरीचच्या संचालिका जान्हवी धारीवाल-बालन यांच्या हस्ते पाच लाख रुपयांचा धनादेश झोन-३नचे डीसीपी संभाजी कदम यांना देण्यात आला. यावेळी महाराष्ट्र राज्याचे अपर पोलीस महासंचालक (कारागृह) अमिताभ गुप्ता, सिनेअभिनेते मकरंद अनासपुरे, माजी आमदार जगदीश मुळीक, मोहन जोशी आदी उपस्थित होते.
पुणे शहराची कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी पुणे पोलीस दलाकडे असते. याबरोबरच पुण्यामध्ये होणारे गणोशोत्सव आणि नवरात्रौत्सव निर्विघ्नपणे पार पडावेत, यासाठीही पोलीस दल दक्ष असतात. गणेशोत्वामध्ये सलग चोवीस तास आपले कर्तव्य पार पाडतात आणि त्यामुळेच नागरिकांना या सर्व उत्सवाचा आनंद घेता येतो.
समाजातील कला आणि क्रीडा क्षेत्रातील विविध नागरिकांना प्रोत्साहन देऊन त्यांना त्यांच्या ध्येयापर्यंत पोहचण्यासाठी मुख्य आधार देण्याचे काम आमच्या ग्रुप तर्फे करण्यात येते. या हेतूनेच पोलीसांच्या असामान्य कामगिरीला सलाम म्हणून तसेच पोलीसांच्या कुटुंबीयांना मदत मिळावी म्हणून आम्ही निधी सुपूर्द केल्याचे बालन म्हणाले.
पुनीत बालन ग्रुपतर्फे नुकतेच पुण्यातील गणपती मंडळ, नवरात्र मंडळ, ढोल-ताशा पथक आणि मीडिया यांंच्या संघांचा समावेश असलेल्या “फ्रेंडशिप करंडक’ क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेच्या निमित्ताने पुणे पोलीस आणि पुनीत बालन ग्रुप यांच्यामध्ये एक मैत्रिपूर्ण सामना आयोजित करण्यात आला होता.
या सामन्यात पुणे पोलीस संघाने पुनीत बालन ग्रुपवर अखेरच्या षटकामध्ये निसटता विजय मिळवला. पहिल्यांदा फलंदाजी करताना पुनीत बालन ग्रुपने १० षटकामध्ये पाच गडी गमावून ९२ धावांचे आव्हान उभे केले. कुणाल भिलारे (३९ धावा), पुनीत बालन यांनी नाबाद १५ धावा आणि राहुल साठे याने २३ धावा करून संघाच्या डावाला आकार दिला. पुणे पोलिस संघाने अखेरच्या षटकामध्ये हे लक्ष्य गाठले. पप्पु तोडकर याने ४४ धावा आणि किरण गायकवाड याने नाबाद ३५ धावा करून संघाचा विजय साकार केला.
सामन्याचा संक्षिप्त निकालः
पुनीत बालन ग्रुपः १० षटकांत ५ गडी बाद ९२ धावा (कुणाल भिलारे ३९, पुनीत बालन नाबाद १५, राहूल साठे २३, अतुल महनगुडे ३-२९) पराभूत वि. पुणे पोलीसः ९.३ षटकांत २ गडी बाद ९६ धावा (पप्पु तोडकर ४४, किरण गायकवाड नाबाद ३५, अक्षय जाधव २-१४); सामनावीरः पप्पु तोडकर.