* स्टीवर्ट ऱ्होडसला मिळाली18 वर्षांची सर्वाधिक शिक्षा
* “ओथ किपर्स’ गटाच्या म्होरक्याला ठरवले दोषी
* दहशतवादाच्या आरोपात शिक्षा देण्याची शक्यता
वॉशिंग्टन – अमेरिकेची संसद असलेल्या कॅपिटल हिल इमारतीवर 6 जानेवारी 2021 रोजी करण्यात आलेल्या हल्ल्याप्रकरणी “ओथ किपर्स’ या कट्टरवादी गटाच्या म्होरक्याला या हल्ल्याच्या कारस्थानाबद्दल दोषी ठरवून 18 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. स्टीवर्ट ऱ्होडस असे या सूत्रधाराचे नाव असून 2020 साली झालेल्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजयी झालेल्या ज्यो बायडेन यांना व्हाइट हाऊसपासून दूर ठेवण्यासाठी ऱ्होडस याने आठवडाभर हल्ल्याचा कट केला होता.
कॅपिटल हिल हल्ला प्रकरणी ऱ्होडस हा देशद्रोहाच्या आरोपाखाली शिक्षा सुनावला गेलेला पहिला आरोपी आहे. या हल्ल्यामध्ये शेकडो जण सहभागी झाले होते. ऱ्होडस याला सुनावण्यात आलेली शिक्षा आतापर्यंतची सर्वात जास्त कालावधीची शिक्षा आहे. कट्टर उजव्या विचारसरणीच्या गटाच्या म्होरक्याला देशद्रोहाच्या कारस्थानाखाली सुनावण्यात आलेली देखील ही सर्वात जास्त कालावधीची शिक्षा आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा अध्यक्ष बनण्यासाठी प्रयत्नशील असताना ही शिक्षा सुनावण्यात आली आहे.
या प्रकरणी दहशतवादाच्या आरोपाची शिक्षा सुनावण्याची तयारीही न्यायाधीशांनी केली आहे. ती शिक्षा सुनावली गेल्यास देशातील अन्य उजव्या विचारसरणीच्या गटांनाही जरब बसू शकेल. “प्राऊड बॉईज’ गटाचा नेता एनरिक तारिओ याला देखील या गंभीर आरोपाखाली दोषी ठरवण्यात आले आहे.
ऱ्होडस याने शिक्षा माफ होण्यासाठी माफी मागितली नाही. तसेच त्याने दयेसाठी अर्जदेखील केला नाही. उलट त्याने राजकीय कैदी होण्याची इच्छा व्यक्त केली. त्याने सरकारी वकिलांवर आणि बायडेन प्रशासनावर टीका देखील केली. जे लोक आमच्या देशाचे नुकसान करत आहेत, त्यांना विरोध केला हाच माझा एकमेव गुन्हा असल्याचे त्याने म्हटले आहे. त्याच्या मग्रुरीबाबत न्यायालयाने संतापही व्यक्त केला.
भारतीय वंशाच्या न्यायाधीशांचा निकाल
स्टीवर्ट ऱ्होडस याला शिक्षा सुनावणारे न्यायाधीश अमित मेहता हे भारतीय वंशाचे न्यायाधीश आहेत. स्टिवर्ट ऱ्होडस हा अमेरिकेला धोका आहे. त्याला देशातील लोकशाहीचे रुपांतर हिंसाचारामध्ये करायचे होते, हे उघड असल्याचे निरीक्षण न्यायाधीश मेहता यांनी नोंदवले. 6 जानेवारीला झालेल्या घटनेची पुनरावृत्ती होऊ शकते. अमेरिकेत आगामी काळात निवडणुका होणार असल्यामुळे अमेरिकेच्या नागरिकांनी प्रत्येक वेळी सतर्कता बाळगायला हवी, असेही त्यांनी म्हटले आहे.
25 वर्षांच्या शिक्षेची मागणी
सरकारी वकिलांनी ऱ्होडस याला 25 वर्षांच्या शिक्षेची मागणी केली होती. ऱ्होडस याने अध्यक्षीय अधिकारांचे हस्तांतरण रोखण्यासाठी प्रतिक्रिया म्हणून देशाच्या सर्वभौम इमारतीवर सशस्त्र हल्ला घडवून आणला. व्हर्जिनिया हॉटेलमध्ये हल्ल्याची तयारी केली गेली होती. त्याला सुनावलेली शिक्षा दहशतवादाच्या आरोपाखाली वाढवण्याची विनंती न्यायालयाने आगोदर फेटाळली होती. मात्र “ओथ किपर्स’ ने धमकावणी आणि दडपशाहीने सरकारवर दबाव आणला होता, असे सरकारी वकिलांनी सांगितल्यावर ही विनंती मान्य केली आहे.