तळेगाव दाभाडे – पतीकडून होणाऱ्या छळाला कंटाळून एका 32 वर्षीय महिलेने रेल्वेखाली आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र रेल्वे पोलिसांनी रूळावर धाव घेत त्या मायलेकाला वाचविले. ही घटना गुरूवारी (दि. 25) दुपारी मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडे रेल्वे स्टेशनवर घडली.
पतीशी वारंवार होत असलेल्या भांडणाला कंटाळून आत्महत्या करण्यासाठी एका 32 वर्षीय महिलेने आपल्या तीन वर्षीय मुलासह तळेगाव दाभाडे रेल्वे स्टेशन गाठले. स्टेशनवरील प्लॅटफॉर्मवर उभी असताना तिची घालमेल सुरू होती. पहिल्या येणाऱ्या कोणत्याही रेल्वे गाडीखाली तिने जीव देण्याचे निश्चित केले. अचानक एक मालगाडी येताना दिसली. क्षणाचाही विलंब न करता तिने मालगाडीखाली जीव देण्यासाठी प्लॅटफॉर्मवरून रूळावर उडी मारली. ही बाब प्रवाशांच्या लक्षात येतात त्यांनी आरडाओरडा करीत त्या महिलेला पुढे जाण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र ती आत्महत्या करण्याच्या मतावर ठाम असल्याने तिने पुढे जाणे सुरूच ठेवले.
रेल्वे मालगाडी अगदी काही मीटर अंतरावर होती. प्रवाशांचा गलका ऐकून रेल्वे पोलीस श्याम केंद्रे व शुभांगी नलावडे यांनीही रेल्वे रूळावर धाव घेतली. रुळावर आत्महत्येसाठी उभ्या असलेल्या महिला व तिच्या मुलाला बाजूला ओढले. काही क्षणातच मालगाडी अत्यंत वेगाने निघून गेली. मात्र त्या महिलेचा प्राण वाचविल्याचे समाधान पोलिसांच्या आणि प्रवाशांच्या चेहऱ्यावर दिसत होते.
पोलिसांनी त्या महिलेला चौकीत आणून पाणी पिण्यास दिले. त्यानंतर तुम्ही दोघेजण आत्महत्या का करीत होता, अशी विचारणा केली. पतीशी वारंवार होणाऱ्या भांडणाला कंटाळून तिने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे रेल्वे पोलिसांना सांगितले. त्यानंतर रेल्वे पोलिसांनी तिचे समुपदेशन करून घरी पाठविले.
आम्हाला गस्तीवर असताना आरडाओरडा ऐकू आल्याने ही घटना लक्षात आली. आम्ही क्षणाचाही विलंब न लावता महिलेला धावत जाऊन बाजूला काढले व समुपदेशन करून सोडले. तसेच या घटनेला कारणीभूत असलेल्या तिच्या पतीचेही समुपदेशन करणार आहोत.
– श्याम केंद्रे, रेल्वे पोलीस