पुणे – सध्या सर्वत्र पिंपरी-चिंचवड मधील ट्रकवरील फिरत्या मंगल कार्यालयाची जोरदार चर्चा रंगली आहे. गेल्या काही वर्षांपासून मोकळ्या मैदानात मंडप बांधून विवाह सोहळा करण्याची पद्धत जवळपास बंदच झाली आहे. आता नागरिक मोठ-मोठ्या मंगल कार्यालयात लग्न करण्याच्या पद्धतीला जास्ती पसंती देतात.
त्यातच आता पिंपरी- चिंचवड येथे भन्नाट शक्कल लढवली आहे. ज्या व्यक्तींना महागडे वेडिंग हॉल परवडत नाही अशांसाठी फिरते मंगल कार्यालय तयार करण्यात आले आहे. सर्वसामान्य व्यक्तींसाठी हे मंगलकार्यालय मस्त आणि स्वस्त पर्याय ठरु शकते.
दयानंद दरेकर असे अनोखी शक्कल लढवणाऱ्या मंडप व्यावसायिकाचे नाव असून सर्वसामान्य व्यक्तींना वेडिंग हॉल किंवा हॉटेलमधील खर्च झेपत नाही. अश्या नागरिकांसाठी दयानंद दरेकर यांनी हा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. दरेकर यांना ट्रकवरील मंगल कार्यालय बनवण्यासाठी तब्बल 50 लाख रुपये खर्च आल्याचं ते म्हणतात.
वातानुकूलित प्रशस्त हॉल, विद्युतरोषणाई अशा अनेक आधुनिक सुविधा या फिरत्या मंगल कार्यालयात आहे. याशिवाय इतरही सोई आणि सुविधा या कार्यालयात उपलब्ध करण्यात आल्या आहेत. ज्या ठिकाणी कार्यक्रम आहे तिथे हे चालते फिरते मंगल कार्यालय घेऊन उभारू शकतो. आणि काही मिनिटातच कार्यक्रम किंवा सोहळा सुरू करता येऊ शकतो.