पुणे – पुणे महापालिकेत नोकरी मिळवून देण्याच्या आमिषाने दोन तरुणींची 15 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी आशिष चंद्रकांत तावडे (रा. कर्वेनगर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका तरुणीने सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार तरुणी सिंहगड रस्ता भागात राहायला आहे. तरुणीची परिचितामार्फत आरोपी तावडेशी ओळख झाली होती.
तावडेने तरुणीला पुणे महापालिकेत नोकरी लावण्याचे आमिष दाखविले होते. तक्रारदार तरुणी आणि तिच्या मैत्रिणीकडून तावडेने वेळोवेळी 15 लाख रुपये उकळले. बनावट नियुक्ती पत्र देऊन फसवणूक केली. तरुणीने तावडेकडे विचारणा केली, तेव्हा त्याने सातत्याने उडवाउडवीची उत्तरे दिले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तरुणीने पोलिसांकडे तक्रार दिली. तावडेविरुद्ध फसवणूक बनावट दस्तऐवज तयार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, यापूर्वीदेखील असे प्रकार उघडकीस आले होते, असे पोलिसांनी सांगितले.