पुणे – पुणे पोलिस आयुक्तालयातील रिक्त 214 शिपाई पदासाठीची मंगळवारी (दि.5 ) लेखी परिक्षा होणार आहे. त्यासाठी परिक्षा केंद्रावर 79 तब्बल पावणेतीन हजार पोलिस अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. त्याशिवाय परिक्षेच्या दृष्टीकोनातून सर्व तयारी झाली असल्याची माहिती पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिली आहे.
पुणे पोलिस आयुक्तालयातील रिक्त झालेल्या 214 पोलिस शिपाई पदासाठी 2019 मध्ये जाहिरात देण्यात आली होती. मात्र, कोरोनामुळे पोलीस भरती प्रक्रिया लांबणीवर पडली होती. आता कोरोना संसर्ग कमी झाल्यानंतर भरती प्रक्रियेला सुरवात करण्यात आली आहे. त्यानुसार 214 पदांसाठी तब्बल 39 हजार 323 उमेदवारांनी अर्ज केले आहेत.
पोलिस भरतीमध्ये पहिल्यांदा लेखी परिक्षा ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार मंगळवारी होणाऱ्या परिक्षेच्या पोलिसांनी कडक बंदोबस्त तैनात केला आहे. त्यामध्ये अपर पोलीस आयुक्त-2, पोलीस उपायुक्त-8, सहायक पोलीस आयुक्त-13, पोलीस निरीक्षक-76, एपीआय-87, पोलीस उपनिरीक्षक-80, कर्मचारी-2 हजार 478 नियुक्ती करण्यात आली आहे.