पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने भोजनगृहासंदर्भात (रिफेक्टरी) विद्यार्थ्यांना विश्वासात न घेता अचानक परिपत्रक काढले होते. याला विद्यार्थ्यांनी जोरदार विरोध करत गोंधळ घातला होता. याप्रकरणी विद्यापीठाने 12 विद्यार्थ्यांवरील गुन्हे त्वरीत मागे घ्यावेत, अन्यथा बेमुदत उपोषण आंदोलन करण्यात येईल, असा इशारा विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी दिला आहे.
विद्यापीठाने 1 एप्रिल रोजी रिफेक्टरीच्या नियमावलीत बदल केला. एका ताटात दोन व्यक्ती जेवू शकत नाहीत, मासिक पास नसलेल्यांना प्रवेश बंद अशा नियमांचा त्यात समावेश करण्यात आला होता. सुरक्षा रक्षक तैनात केल्यामुळे विद्यार्थ्यांना रिफेक्टरीत जेवणासाठी जाऊच दिले नाही. मोठ्या संख्येने विद्यार्थी जमले होते. याचवेळी सुरक्षा रक्षक व विद्यार्थी यांच्यात धक्काबुक्की झाली. या ठिकाणच्या भोजनाच्या दर्जाबाबत विद्यार्थ्यांकडून अनेकदा तक्रारी दाखल करण्यात आलेल्या आहेत. त्यावर विद्यापीठ प्रशासनाने मार्ग काढण्याऐवजी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवून गंभीर गुन्हे दाखल केले आहेत. हा अजब प्रकार आहे, अशी माहिती विद्यार्थ्यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली आहे.
विद्यार्थ्यांवर दडपशाही करुन विद्यार्थ्यांचा आवाज दाबण्याचे काम विद्यापीठ प्रशासनाकडून सुरु आहे. गुन्हे दाखल करुन विद्यार्थ्यांच्या भविष्याचे वाटोळे विद्यापीठ करत आहे. विद्यापीठाने विद्यार्थी हिताचा विचार करावा, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून विद्यापीठाकडे करण्यात आली आहे. या पत्रकार परिषदेस विकास खंडागळे, मुन्ना आरडे, आकाश भोसले, मारुती अवरगंड, सतीश गोरे, नंदकुमार हांगे, कुणाल सपकाळ आदींनी उपस्थित राहून माहिती दिली आहे.