पुणे-अफगाणिस्तान देशातील संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार असल्याचे आश्वासन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी अफगाणी विद्यार्थ्यांना दिले.
उच्च व तंत्रशिक्षण मंत्री सामंत यांनी सरहद संस्थेच्या वतीने आयोजित महाराष्ट्रातील अफगाण विद्यार्थ्यांसोबत येथील ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरिअल सोसायटीचे इन्स्टीट्यूट ऑफ इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी येथे संवाद साधला. यावेळी उच्च शिक्षण संचालक धनराज माने, ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरिअल सोसायटीचे इन्स्टीट्यूट ऑफ इन्फर्मेशन टेक्नॉलॉजीचे अध्यक्ष मालोजीराजे, सरहद संस्थेचे अध्यक्ष संजय नहार, किरण साळी, अफगाणी विद्यार्थी प्रतिनिधी महमद अफगाणी यांच्यासह अफगाणी विद्यार्थी उपस्थित होते.
सामंत म्हणाले, अफगाणिस्तानातील विद्यार्थी आपल्या राज्यात शिकत आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे सहानुभूतीपूर्वकच बघितले पाहिजे. महाराष्ट्राचा एक वेगळा आदर्श त्यांच्या देशासमोर आणि जगासमोर उभा राहिला पाहिजे. सर्व विद्यापीठे एकत्र येऊन या विद्यार्थ्यांना मदत करतील. त्यांना कुठेही असे वाटणार नाही की आपण परदेशामध्ये शिकालयला आलो आहोत. महाराष्ट्र सरकार त्या विद्यार्थ्यांवर कोणताही अन्याय होऊ देणार नाही.
अफगाण विद्यार्थ्यांना काय मदत करू शकतो यावर आज चर्चा करण्यात आली. महाराष्ट्र राज्याच्या परंपरेंनुसार मी त्या विद्यार्थ्यांना शब्द दिला आहे की आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. पुण्यात शिकायला येणाऱ्या 541 विद्यार्थ्यांना कसे आणता येईल याचा प्रयत्न सुरू आहे. राज्य सरकारने जर अफगाणिस्तानातील मुलांना शिकवण्याची परवानगी दिली तर त्यांच्या राहण्याचा आणि खाण्याचा खर्च करण्याची तयारी काही महाविद्यालयांनी दर्शवली आहे. या विद्यार्थ्यांच्या व्हिसा व शुल्कसंदर्भात योग्य ते मार्ग काढले जाणार असल्याचे उदय सामंत यांनी म्हटले आहे.
अफगाण विद्यार्थ्यांचे शुल्क कमी करा
अफगाण देशावर मोठ संकट आलेले आहे. दहशतवाद्यांनी देशावर ताबा घेतला आहे. अशी स्थिती असताना अफगाणिस्तानातील बहुतांश विद्यार्थी पुण्यात खासगी विद्यापीठ, महाविद्यालये व अन्य विद्यापीठांत शिकत आहेत. खासगी विद्यापीठातील शुल्काची रक्कम मोठी आहे. ही शुल्क कमी करण्यासंदर्भात सर्व खासगी विद्यापीठ व महाविद्यालयांना सूचना दिल्या जातील. या विद्यार्थ्यांचा संस्थांनी सहानुभूतिपूर्वक विचार करायला हवा, असेही उदय सामंत यांनी सूचित केले.