सिंहगडरस्ता –शहरात सध्या अतिक्रमण विभागाची कारवाई सर्वत्र जोरात सुरू आहे, याचे नागरिकांनी स्वागत केले आहे. परंतु, समाविष्ट गावांतील अनधिकृत बांधकामांवर कारवाई होत नसल्याचे चित्र आहे. पीएमआरडी, महापालिकेचे नगररचना विभागाचे सर्व नियम मोडीत काढून अगदी फेस टू फेस बांधकाम केले जात आहे, अशा अनधिकृत बांधकामांवर कारवाई केंव्हा होणार? असा सवाल शहरी भागात अतिक्रमण कारवाईचा फटका बसलेले नागरिक विचारत आहेत.
पालिका अधिकाऱ्यांशी संवाद साधला असता या विषयांवर ते पूर्ण अनभिज्ञ असल्याचे दिसून आले. अधिकाऱ्यांच्या अशा कामचलावू भूमिकेमुळेच ते लोकप्रतिनिधीच्या हाताचे बाहुले बनले आहेत. अधिकाऱ्यांच्या डोळेझाकपणा वृत्तीमुळेच ग्रामीण भागात अनधिकृत बांधकामांना बळ मिळत आहे.
– चारुदत्त घाडगे, माहिती अधिकार अभ्यासक
प्रशासनाने अशा अनाधिकृत बांधकामावर कडक कारवाई केली पाहिजे. नागरिकांनाही आवाहन आहे की अधिकृत रेरा मंजूर प्रकल्पामधून घर घेणे केव्हाही चांगले, त्यामुळे फसवणूक होणार नाही.
– नंदू घाटे, अध्यक्ष, मराठी बांधकाम व्यावसायिक संघटना
सध्या शहरातील अनाधिकृत बांधकामाबाबत आमचा सर्वे सुरू आहे. लवकरच महापालिका हद्दीतील समाविष्ट गावांतील अनधिकृत बांधकामाबाबत सर्व्हेक्षण करून नियमबाह्य बांधकामांवर कारवाई होईल.
– रामदास जगताप, उपआयुक्त, पीएमआरडी