पुणे – मनोरुग्णालयाला होणार अतिरिक्‍त औषध पुरवठा?

पुणे – मनोरुग्णांना दर्जेदार सेवा मिळावी आणि त्यांच्यावर प्रभावी उपचार व्हावेत, यासाठी येरवडा येथील प्रादेशिक मनोरुग्णालयाने कंबर कसली आहे. त्याचाच एक भाग म्हणून या मनोरुग्णांना वेळेवर आणि प्रभावी औषधे मिळावीत यासाठी राज्य शासनाच्या आरोग्य विभागाला प्रस्ताव देण्यात आला आहे.

येरवडा येथील प्रादेशिक मनोरुग्णालय हे राज्यातील सर्वात मोठे मनोरुग्णालय आहे. याच्या अखत्यारीत तब्बल सोळा जिल्ह्यांचा समावेश आहे. त्यामुळे येथे उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. त्यानुसार महिन्याकाठी जवळपास 30 ते 40 हजार मनोरुग्ण याठिकाणी उपचारासाठी येत असतात. शिवाय, किमान अडीच हजार मनोरुग्ण याठिकाणी दाखल असतात. या मनोरुग्णांच्या उपचारांमध्ये कमतरता भासू नये, यासाठी राज्य शासनाच्या आरोग्य विभागाच्या वतीने नेहमीच दक्षता घेण्यात येते. त्याचा लाभ आतापर्यंत अनेक मनोरुगंणाना झाला असून बहुतांशी रुग्ण हे पूर्णपणे बरे झाले आहेत. मात्र, गेल्या काही वर्षांच्या कालावधीत मनोरुग्णांची संख्या अधिकच वाढत आहे. विशेष म्हणजे या मनोरुग्णांना खासगी डॉक्‍टरांचे उपचार न परवडणारे आहेत. शिवाय, प्रादेशिक मनोरुग्नालयाच्या तुलनेत खासगी डॉक्‍टरांची औषधे फारशी प्रभावी नसल्याचे अनेक रुग्णांचे आणि त्यांच्या नातेवाईकांचे म्हणणे आहे. ही बाब लक्षात घेऊन जास्तीची औषधे देण्यात यावीत, असा प्रस्ताव मनोरुग्णालय प्रशासनाच्या वतीने राज्य शासनाच्या आरोग्य विभागाला देण्यात आला आहे. त्यानुसार काही दिवसांमध्येच ही औषधे उपलब्ध होतील, असा दावा मनोरुग्णालय प्रशासनाच्या वतीने करण्यात आला आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.