पुणे – 2 मेपासून पाणीकपातीची कुऱ्हाड?

एकदिवसाआड पाणी मिळण्याची शक्‍यता : महापालिकेला पाणीकपात करावीच लागणार

पुणे – धरणसाठा लक्षात घेता दररोज आणि तेही दोन वेळा पाणी पुरवठा करणे प्रशासनाला शक्‍य नसल्याने दि.2 मे पासूनच एक दिवसाआड पाणी देण्याचा विचार महापालिका प्रशासनाने सुरू केला असून, 15 जुलैपर्यंत पाणी पुरवण्याच्या दृष्टीने प्रशासनाला हे कठोर पाऊल उचलावेच लागणार आहे. मात्र यासाठी कारभाऱ्यांनीही साथ देणे आवश्‍यक असून, अन्यथा पाणीटंचाईच्या भीषण संकटाला सामोरे जावे लागणार असल्याचे प्रशासनातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.

लोकसभेच्या 2019 च्या सार्वत्रिक निवडणुकांचे चौथ्या टप्प्यातील मतदान येत्या 29 एप्रिलला संपणार आहे. महाराष्ट्रात चारच टप्प्यात मतदान होणार असल्याने, राज्यापुरतीची आचारसंहिता शिथील होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे मोठे निर्णय घेता येत नसले तरी पाणी, आरोग्य या जीवनावश्‍यक गरजांविषयीची निर्णय घेता येतात. त्यामुळे मे महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात म्हणजे दोन मे पासूनच ही कपात करावी लागणार आहे.

धरणात सद्यस्थितीत सात टीएमसी पाणीसाठा आहे. त्यातील केवळ साडेतीन टीएमसी पाणीसाठा महापालिकेला मिळणार आहे. वास्तविक 15 जुलैपर्यंत या पाण्याचे नियोजन गृहित धरले तर महापालिकेला साडेचार टीएमसी पाणी लागणार. त्यामुळे एक टीएमसी पाण्याएवढी बचत महापालिकेला करावी लागणार आहे. महापालिकेला महिन्यला सुमारे सव्वा टीएमसी पाणी लागते. ही बचत एक दिवसाआड पाणी देऊनच करणे महापालिकेला शक्‍य होणार आहे.

गुरूवारी संपूर्ण दिवसाचाच पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा एक पर्याय महापालिकेपुढे आहे. मात्र संपूर्ण पाणीपुरवठा बंद ठेवल्यास हवेचा दाब निर्माण होणे, शुक्रवार, शनिवार या दोन दिवशीच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम होणे असे प्रकार होतात. त्यामुळे संवेदनशील परिस्थिती निर्माण होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. यासाठीच भागांचे नियोजन करून एक दिवसाआड पाणी देणेच संयुक्तिक असल्याचे मत एका वरिष्ठ अधिकाऱ्याने व्यक्त केले.

… तर परिस्थिती भीषण
कारभाऱ्यांनी याबाबत लवकर निर्णय घेऊन प्रशासनाला कपातीबाबत हिरवा कंदील दाखवला नाही आणि दि.15 जुलैपर्यंत पुरेसा पाऊस नाही पडला तर पाण्याटंचाईची भीषण परिस्थिती पुणे शहरात निर्माण होणार आहे. अशा परिस्थितीत नागरिकांचा विचार करून प्रशासनालाच सक्तीने निर्णय घ्यावा लागणार आहे. मात्र याचे खापर प्रशासनावर फुटणार ही शक्‍यता देखील नाकारता येत नाही.

धरणांतील 7 टीएमसी पाण्याची विभागणी
धरणातील सात टीएमसी पाण्याची विभागणी करायची झाल्यास दीड टीएमसी पाण्याची बाष्पीभवन, अर्धा टीएमसी पाणी जून-जुलैदरम्यान संत ज्ञानेश्‍वर आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालखीवेळी सोडले जाणार आहे. उन्हाळी आवर्तन चार टीएमसी द्यावे लागते. मात्र, यंदाचा धरणसाठा लक्षात घेता तो तीन टीएमसीच सोडण्यात येणार आहे. आतापर्यंत दीड टीएमसी सोडण्यात आला आहे, आणखी दीड टीएमसी शेतीसाठी सोडावे लागणार आहे. उरलेल्या तीन टीएमसी पाण्यामध्ये महापालिकेला 15 ऑगस्टपर्यंतचे नियोजन करावे लागणार आहे.

पाण्याचा निर्णय राजकीय कोर्टात गेल्यानेच परिस्थिती
लोकसभा निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर मतदारांना खूष ठेवण्यासाठी पाणीकपात वगैरे विषय सत्ताधाऱ्यांनी करू दिले नाहीत. ज्यावेळी काही प्रमाणात कपात करणे आवश्‍यक होते त्याच काळात सत्ताधाऱ्यांनी दटावल्यामुळे प्रशासनाला हा निर्णय घेता आला नाही. त्याचे परिणाम आता निवडणूक झाल्यावर मतदारांना भोगावे लागणार आहेत. पाण्याचा निर्णय राजकीय कोर्टात गेल्यानेच ही परिस्थिती उद्‌भवल्याची वस्तुस्थिती यानिमित्ताने उघड झाली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.