तळबीड पोलीस ठाण्यात चालतयं “काय-द्याल’चं राज्य?

अवैध धंद्यांवरील कृपादृष्टीमुळे होतोय सर्वसामान्यांना त्रास; बेकायदेशीर धंद्यात पोलिसांचीही भागीदारी

गोरक्षकांचीही केली अवहेलना

रविवार, दि. 21 रोजी गोरक्षांनी अवैधरित्या बैलांची वाहतूक करणारा ट्रक तळबीड पोलीस स्टेशनच्या हद्दीत पकडून दिला. याप्रकरणातही तळबीडच्या पोलीस अधिकाऱ्यांनी संबंधित कसाईला पाठीशी घालण्याचा प्रकार केला. या ट्रकमधील बैलांची सुटका करताना एका बैलाचे चारही पाय बांधलेल्या अवस्थेत होते. यावेळी तळबीड पोलिसांना गोरक्षकांनी विनवणी केली तरीही त्यांनी याकडे लक्ष न देता संबंधित कसाईच्या गाडीतून प्रवास केला. तळबीड पोलीसांनी माध्यमांच्या प्रतिनिधीचीही अवहेलना करण्याचा प्रकार केला आहे.

कोपर्डेहवेली – जिल्ह्यात सर्वत्र अवैध धंद्यावर चाप बसवण्यात पोलिसांनी यश मिळवले असताना तळबीड पोलीस ठाण्याच्या हद्दीत मात्र दारूधंदे फार्मात आहेत. त्याच बरोबर मटका ओपन असून या अवैध धंद्यावर तळबीड पोलिसांची कृपादृष्टी कायम आहे. आर्थिक तडजोडीतून या अवैध धंद्यांना पाठीशी घालण्यात येत असल्याची चर्चा नागरिकांमधून होत आहे. सर्वसामान्यांच्या किरकोळ चुकीसाठी कायद्याची भाषा करणारे तळबीड पोलीस अवैध व्यवसायिकांसाठी काय-द्यायचे भाषा वापरताना दिसत असल्याची तक्रारीत दिवसेंदिवस वाढ होवू लागली आहे.

सर्वसामान्य माणसाला कायदा शिकवताना तळबीड पोलीस ठाण्यातील काही कर्मचारी स्वतः बेकायदेशीर धंद्यात भागिदारी करत आहेत. महामार्गावरून होणारी कत्तलखान्याकडे जाणारी वाहतूक, गुटखा वाहतूक, वाळू व्यवसायातील भागिदारी या मार्गाने त्यांनी बरीच माया जमा केल्याची गुप्त चर्चा सुरू आहे. तळबीड पोलीस ठाण्याच्या सहायक पोलीस निरीक्षक वैशाली पाटील यांच्या कार्यपद्धतीबद्दल कर्मचाऱ्यांमध्येही कमालीचा असंतोष असून तसा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये सहायक पोलीस निरीक्षक वैशाली पाटील या मर्जीतील कर्मचाऱ्यांना पोलीस ठाण्यात ड्युटी देवून त्यांचेकडून प्रत्येकी तीन हजार रुपये घेत आहेत व इतर कर्मचाऱ्यांना बंदोबस्त ड्युटी देत असल्याचा आरोप भिंगारदिवे या कर्मचाऱ्याने केला आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.