70 वर्षीय वृद्धाची बिबट्याशी झुंज

पारनेर – नगर कल्याण महामार्गावर असणारे पारनेर तालुक्‍यातील काळेवाडी (सावरगाव) येथील शेतकरी चैनू कोंडीबा शिंदे (वय 70) हे बिबट्याच्या हल्लात जखमी झाले आहेत. घरासमोरील अंगणातील खाटाखाली हा बिबट्या शुक्रवारी (दि.26) सकाळी 11 वाजता घुसला असताना त्याला हुसकावून लावण्याच्या प्रयत्न केला असता या बिबट्याने शेतकऱ्यावर हल्ला केला. पिण्याच्या पाण्याच्या शोधार्थ हा बिबट्या हल्ल्यात जखमी झालेल्या शेतकऱ्याच्या घरासमोरील विहिरीवर दिसला होता.

घराजवळच जनावरे बांधलेली असल्यामुळे जनावरांना वाचविण्यासाठी शिंदे घराकडे धावले. त्यामुळे प्रतिकार करताना व त्या ठिकाणहून हुसकावून लावताना बिबट्याने त्यांच्या डाव्या मांडीला चावा घेतला. या बिबट्याला झुंज देऊन पळून लावण्याचा प्रयत्न केला असता जनावरांच्या गोठ्याचा दरवाजा उघडा असल्यामुळे बिबट्या त्या ठिकाणी घुसला. लगेच शिंदे यांनी गोठाचा दरवाजा बंद करून बिबट्याला कैद केले.

शिंदे यांना उपचारासाठी ग्रामस्थांनी दुचाकीवर टाकळी ढोकेश्‍वर येथील ग्रामीण रुग्णालयात आणले. बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल आहे. या बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाने पिंजरा लावण्याची तयारी केली असून भक्षाच्या व पाण्याच्या शोधार्थ मानवी वस्तीकडे बिबटे धाव घेऊ लागले आहेत, त्यामुळे वनविभागाने किमान या प्राण्यांसाठी वनविभागाच्या हद्दीत पिण्याच्या पाण्याची सोय करावी अशी मागणी प्राणीमित्र संघटना व शेतकऱ्यांनी केली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.