पुणे – तातडीच्या देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी नगर रस्ता परिसर वगळता उर्वरित शहराचा पाणी पुरववठा गुरूवारी (दि.२१) बंद ठेवण्यात येणार आहे. दरम्यान, महापालिकेने शहरातील पाणी वापरात कपात करावी, अशा सूचना जलसंपदा विभागाने काही दिवसांपूर्वीच केल्या आहेत. त्यानंतर लगेचच पाणी बंदचा निर्णय घेण्यात आल्याने ही पाणी कपातीची तयारी आहे का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
पर्वती जलशुद्धीकरण केंद्र व त्या अंतर्गत पर्वती एमएलआर टाकी परिसर, पर्वती एचएलआर टाकी परिसर, व पर्वती एलएलआर टाकी परिसर, लष्कर जलकेंद्र, नवीन व जुने होळकर जलकेंद्र, वारजे जलकेंद्र व त्या अखत्यारीतील चांदणी चौक टाकी परिसर, गांधी भवन टाकी परिसर, पॅनकार्ड क्लब जीएसआर टाकी परिसर, वारजे जलकेंद्र लगत जीएसआर टाकी परिसर, वारजे माळवाडी व रामनगर परिसर व चतु:शृंगी टाकी परिसर, वडगाव जलकेंद्र परिसरावर अवलंबून असलेला पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.
नगर रस्ता परिसरात नियमित पाणी
दरम्यान, भामा-आसखेड धरणातून करण्यात येणारा पाणीपुरवठा गुरूवारी सुरू असेल. यात कळस, धानोरी, येरवडा, नगररस्ता, विमाननगर, लोहगाव, खराडी, वडगावशेरीचा काही भाग, चंदननगर परिसराचा समावेश आहे. मागील आठवड्यात भामा-आसखेड प्रकल्पाचा वीज पुरवठा खंडीत झाल्याने या भागास दोन दिवस पाणी मिळाले नव्हते. त्यामुळे पाणी बंद म्हणून हा भाग वगळण्यात आला आहे.
कपातीचे नियोजन ?
महापालिकेने दैनंदिन पाणीवापर कमी करून जुलै २०२४ अखेरपर्यंत अडीच टीएमसी पाणी वाचविण्याचे आदेश जलसंपदा विभागाने दिले आहेत. त्यानुसार महापालिकेने नियोजनही सुरू केले आहे. काही भागांत पर्यायी यंत्रणेद्वारे पाणी द्यायचे आहे. त्यामुळे पालिकेने पाणीबचत सुरू केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून प्रत्येक गुरुवारी पाणी बंद ठेवले जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.