पुणे – गेल्या दोन वर्षांपासून जगभर थैमान घालणारे करोना संकट संपत असतानाच, जगातील 15 देशांमध्ये मंकीपॉक्स या कांजण्या सदृश आजाराचे संकट जगावर घोंगावत आहे. पुण्यात अद्याप या आजाराचा संशयित अथवा बाधित रूग्ण आढळलेला नसला तरी महापालिका प्रशासनाकडून खबरदारीचा उपाय म्हणून डॉ. नायडू सांसर्गिक रुग्णालयात या रुग्णांवरील उपचारासाठी एक वॉर्ड राखीव ठेवण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाचे प्रमुख डॉ. संजीव वावरे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
दक्षिण आफ्रिकेत माकडापासून आलेला मंकि पॉक्स हा आजार 12 ते 13 देशांमध्ये पसरला आहे. यामध्ये अमेरिका, इंग्लड, आफ्रिका, कॅनडा अशा काही प्रमुख देशांमध्ये या आजाराचे रुग्ण आढळून आले आहेत. या देशांमधून भारतात आणि महाराष्ट्रात येणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. त्यामुळे या आजाराचे संशयित रुग्ण आढळल्यास त्यांच्या उपचारासाठी डॉ. नायडू रुग्णालयात राखीव वॉर्ड ठेवण्यात आल्याचे सहायक आरोग्य अधिकारी डॉ. संजिव वावरे यांनी सांगितले.
आफ्रिकन देशातून आलेल्या रुग्णांना या आजाराची लक्षणे आढळल्यास नायडू रुग़्णालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी केले आहे. दरम्यान, तूर्तास या आजाराचे रूग्ण भारतात आढळले नसले तरी खबरदारी घेण्यात येत असल्याचे डॉ. वावरे यांनी स्पष्ट केले.