पुणे – महापालिकेच्या शहरभरातील पार्किंग मध्ये जवळपास 300 बेवारस गाड्या आढळून आल्या आहेत. गेल्या दोन वर्षांपासून करोनामुळे पार्किंग बंद होती. त्यानंतर, महापालिकेने पुन्हा पार्किंग सुरू करण्यासाठी त्यांची स्वच्छता मोहीम हाती घेतली असता त्यात पडून असलेल्या चारचाकी तसेच दुचाकी आढळून आल्या आहेत. त्यामुळे महापालिकेने या गाड्यांची माहिती आरटीओ तसेच वाहतूक पोलिसांना कळविली असून त्यानंतर या गाडया जप्त केल्या जाणार असल्याचे पालिकेच्या वाहतूक नियोजन विभागाचे प्रमुख श्रीनीवास बोनाला यांनी सांगितले.
महापालिकेकडून शहरात 30 पार्किंग उभारण्यात आली आहेत. यातील, सात ते आठ पार्किंग बहूमजली असून त्यामध्ये मंडई, नारायणपेठ, पुणे स्टेशन, हमालवाडा अशा काही महत्वाच्या पार्किंगचा समावेश आहे. या मिळकती आधी महापालिकेच्या मालमत्ता व्यवस्थापन विभागाकडे होत्या. त्यामुळे त्याचे निविदा काढून त्यांच्याकडून व्यवस्थापन केले जात होते. मात्र, करोना काळात अनेक व्यावसायिकांनी पार्किंगची थकबाकी ठेवल्याने त्यांच्याकडून ही पार्किंग काढून घेण्यात आली आहेत. तसेच त्याचे नियोजन आता वाहतूक नियोजन विभागाकडे देण्यात आले आहे. या विभागाकडून नुकतेच या सर्व पार्किंगची निविदा काढण्यापूर्वी स्वच्छता करण्यात आली. त्यात, 100 हून अधिक चारचाकी तसेच 200 दूचाकी अनेक महिन्यांपासून पार्किंगमध्ये पडून असल्याचे समोर आले आहे. महापालिकेने या गाड्या जप्त करून त्याचा लिलाव करण्याचा निर्णय घेतला आहे.
पार्किंग मध्ये असलेल्या गाड्या पूर्णपणे बंद असून काही गाड्या अनेक वर्षांपासून पडून आहेत. त्या चोरीच्या अथवा गुन्ह्यातील असण्याची शक्यता आहे. त्यामुळे थेट जप्त न करता या गाड्यांची माहिती आरटीओ तसेच वाहतूक पोलिसांना कळविली आहे. आरटीओ कडून या वाहनांची माहिती मिळाल्यानंतर महापालिकांना संबंधितांना नोटीसा देऊन त्यानंतर या गाड्या जप्त करणार आहे. संबंधितांनी ही वाहने ताब्यात घेण्याची तयारी दर्शविली तरी त्यांच्यावर दंडात्मक कारवाईही करण्यात येणार आहे.
– श्रीनीवास बोनाला, प्रमुख, वाहतूक नियोजन विभाग, मनपा