पुणे –निवडणूक आयोगाच्या प्रभाग रचनेच्या सुधारित आदेशानुसार, महापालिकेने अखेर आयोगाने सूचविलेल्या बदलांनुसार अंतिम प्रभाग रचनेचा आराखडा राज्य निवडणूक आयोगास गुरुवारी सादर केला. या रचनेस आयोगाने हिरवा कंदील दिला आहे. 17 मे पर्यंत ही प्रभाग रचना कधीही जाहीर होऊ शकते. दरम्यान, हरकती आणि सूचनाच्या सुनावणीनंतर प्राधिकृत अधिकारी यशदाचे महासंचालक एस. चोक्कलिंगम यांनी सादर केलेल्या अहवालानुसार, नेमके किती बदल प्रभाग रचनेत करण्यात आले, हे आता प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतरच स्पष्ट होणार आहे.
महापालिकेकडून प्रभाग रचनेचा अंतिम आराखडा 10 मार्च 2022 रोजीच राज्य निवडणूक आयोगास सादर करण्यात आला होता. त्यानंतर राज्यशासनानेच निवडणूक कायद्यात बदल केल्याने हे काम अर्धवटच थांबले होते. मात्र, शासनाच्या कायद्याला सर्वोच्च न्यायालयात आवाहन देण्यात आल्यानंतर न्यायालयाने दोन आठवड्यांच्या आत निवडणूक कार्यक्रम जाहीर करावा, असे आदेश देत जुनी प्रभाग रचना कायम ठेवण्याच्या सूचना दिल्या त्यानंतर लगेचच आयोगाकडून प्रभाग रचनेचा सुधारीत कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. त्यात, आयोगाच्या सूचनेनुसार 11 मे रोजी आयोगाच्या सूचनेनुसार, प्रभाग रचना बदल करून अंतिम करणे आणि 12 मे रोजी प्रभाग रचनेस अंतीम मान्यता घेऊन आयोगाची स्वाक्षरी घेऊन अंतिम करण्याचे आदेश होते. त्यानुसार, महापालिकेने सादर केलेली प्रभाग रचना अंतिम करण्यात आली असल्याची माहिती प्रशासकीय सुत्रांनी दिली.
17 मे पर्यंत जाहीर करता येणार…
आयोगाने प्रभाग रचनेस अंतिम मान्यता दिल्यानंतर महापालिकेने त्याचे राजपत्र प्रकाशित करून ही प्रभाग रचना फलक तसेच महापालिकेच्या संकेतस्थळावर जाहीर करायची आहे. त्यासाठी पालिकेस पाच दिवसांची मुदत मिळालेली आहे. मात्र, त्यात शनिवार, रविवार आणि सोमवारी शासकीय सुट्टी असल्याने महापालिकेस गॅझेट प्रसिद्धीचे काम करण्यासाठी उद्या (शुक्रवारचा) एकच दिवस मिळणार आहे. त्यातच, सलग सुट्टी आल्याने पालिकेस येत्या मंगळवारी प्रभाग रचना जाहीर करावीच लागणार आहे.