पुणे (प्रभात वृत्तसेवा) – पुण्याचा वैभवशाली गणेशोत्सव आणि विसर्जन मिरवणुकीसाठी विविध राज्यांसह परदेशातून भाविक येत असतात. शहरातील मुख्य विसर्जन मिरवणूक मार्गांत लक्ष्मी रोड, कुमठेकर रोड, टिळक रोड, केळकर रोड, शिवाजी रोड, जंगली महाराज रोड, कर्वे रोड, शास्त्री रोड यांचा समावेश आहे.
त्यामुळे शहरात येणारे किंवा शहरातून दुसऱ्या बाजूला जाणाऱ्या नागरिकांनी दोन दिवस पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक विभागाकडून करण्यात आले आहे. वाहनचालक कोंडीत अडकू नये, त्यांना पर्यायी मार्ग उपलब्ध व्हावा आणि वाहतूक सुरळीत राहण्यासाठी वाहतूक विभागाकडून रिंगरोड तयार करण्यात आला आहे. त्यानुसार नागरिकांनी याच मार्गाचा वापर करून सहकार्य करावे, असे उपायुक्त राहुल श्रीरामे यांनी सांगितले.
कर्वे रोड – नळस्टॉप चौक येथून लॉ-कॉलेज रोडवरून पुढे सेनापती बापट रोडने सरळ गणेशखिंड रोड येथून उजव्या बाजूला वळून सिमला ऑफिस चौक, संचेती हॉस्पीटल चौक, इंजिनिअरिंग कॉलेज चौक;
आंबेडकर रोडवरील शाहिर अमर शेख चौक, मालधक्का चौक, बोल्हाई चौक, नरपतगिरी चौक;
नेहरु रोडवरुन संतकबीर पोलीस चौकी, सेव्हन लव्हज चौक, वखार महामंडळ चौक; शिवनेरी रोडवरुन गुलटेकडी मार्केट; सातारा रोडने व्होल्गा चौक;
सिंहगड रोडने मित्रमंडळ चौक सावरकर चौक, सिंहगड रोड जंक्शन; लाल बहादुर शास्त्री रोडने सेनादत्त पोलीस चौकी, अनंत कान्हेरे पथावरुन म्हात्रे पुल ते नळस्टॉप सुरु राहील.
या प्रकारे हा रिंगरोड असून, नागरिकांसाठी वरील मार्गावर वाहतूक खुली असून, हा मार्ग शहराच्या बाहेर जाण्यासाठी उपयुक्त आहे, असे वाहतूक विभागाने सांगितले.