पुणे जिल्हा : थकित वीज बिलांसाठी ग्रामपंचायतींना नोटिसा

दिवाबत्ती, पाणीपुरवठ्याची बिले थकित : जिल्ह्यातील ग्रामपंचायतींवर कारवाईचा बडगा
बारामती –
आर्थिक परिस्थिती डबघाईला आल्यामुळे महावितरणने सर्वच थकबाकीदार ग्राहकांवर कारवाई सुरु केली आहे. त्यातून शेतीचा ग्राहकही सुटलेला नाही. आता पाणीपुरवठा व दिवाबत्तीची देयके भरण्याबाबत सर्व ग्रामपंचायतींना महावितरणने नोटीसा दिल्या आहेत. देयके न भरल्यास वीजपुरवठा खंडित करण्याचा इशारा दिला आहे. बारामती परिमंडलात पाणीपुरवठ्याचे 7 हजार 722 व दिवाबत्तीचे 11 हजार 577 ग्राहक थकबाकीत असून त्यांच्याकडे अनुक्रमे 147 कोटी व 809 कोटी इतकी थकबाकी आहे.

राज्य शासनाने गावपातळीवरील दिवाबत्ती व पाणीपुरवठ्याचे वीजबिल भरण्याची 100 टक्‍के जबाबदारी आता ग्रामपंचायत पातळीवर सोपवली आहे. त्याकरिता शासनाने 15 व्या वित्त आयोगाचा निधी वापरण्याची सूचना ग्रामपंचायतीला केली आहे. वीजबिलांसाठी सरपंच व ग्रामसेवकांना जबाबदार धरणार असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे महावितरणने आता वीजबिलांच्या वसुलीसाठी ग्रामपंयाचतींकडे पाठपुरावा सुरु केला आहे.

ग्रामपंचायतींना तशा नोटीसा बजावल्या आहेत. वीजबिले भरण्यात सातत्य नसल्यामुळे थकबाकींचा आकडा वाढतच आहे. परिणामी महावितरणला कठोर कारवाई करणे भाग पडत आहे.

बारामती परिमंडलात पाणीपुरवठ्याचे 1 हजार 127 ग्राहक असून त्यांच्याकडे 54 कोटी 47 लाख, सोलापूर जिल्ह्यात पाणीपुरवठ्याचे 3 हजार 833 कनेक्‍शन आहेत. त्यांच्याकडे 76 कोटी 79 लाख तर सातारा जिल्ह्यात 2 हजार 762 ग्राहकांकडे 16 कोटी 42 लाखांची थकबाकी आहे. दिवाबत्तीमध्ये बारामती मंडलमध्ये 3 हजार 635 कनेक्‍शन व थकबाकी 281 कोटी 19 लाख, सोलापूर जिल्ह्यात 5 हजार 776 ग्राहक 457 कोटी 84 लाख रुपये थकबाकी तर सातारा जिल्ह्यात 2 हजार 166 ग्राहकांकडे 70 कोटी 91 लाख रुपयांची
थकबाकी आहे.

सुटीच्या दिवशी वीजबिल भरणा केंद्रे सुरू राहणार
घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिकसह शेतीपंपाची थकबाकी वसुली मोहीम देखील बारामती परिमंडलात सर्वत्र सुरु आहे. त्यास ग्राहकांचा प्रतिसादही मिळत आहे. हे पाहता गैरसोय व गर्दी टाळण्यासाठी सोलापूर, सातारा व बारामती मंडलातील सर्व अधिकृत वीजबिल भरणा केंद्रे सुट्टीच्या दिवशीही सुरु राहणार आहेत. ग्राहकांना महावितरणच्या मोबाईल प व ुुु.ारहरवळीलो.ळप या संकेतस्थळावरुन बिले भरण्याची सुविधा 24 तास सुरु आहे.

महावितरणतर्फे ग्रामपंचायतींना पाणीपुरवठा व दिवाबत्त्तीच्या देयकांबाबत पत्रव्यवहार करून अवगत केले आहे. त्यामुळे ग्रामपंचायतींनीही महावितरणला सहकार्य करून वीज देयके वेळेत भरावीत व वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई टाळावी.
– सुनील पावडे, मुख्य अभियंता, महावितरण परिमंडल, बारामती.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.