25 हजार 941 दिव्यांगांना लस
पुणे – शहरासह जिल्ह्यात करोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोठ्या प्रमाणात झाले. त्यामध्ये दिव्यांग, तृतीयपंथी, आजारी व्यक्ती, गर्भवती महिला यासह विशेष गटातील नागरिकांचे लसीकरण करण्यावर प्रशासनाकडून अधिक भर देण्यात आला. त्यामुळे जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 32 लाख 81 हजार 602 जणांचे लसीकरण पूर्ण झाले. त्यामध्ये पुणे महापालिकेत 12 लाख 43 हजार, पिंपरी-चिचवडमध्ये 6 लाख 29 हजार, तर ग्रामीणमध्ये 14 लाख 8 हजार लसीकरण झाले आहे.
विशेष गटातील लसीकरण मोहिमेमध्ये दिव्यांग, तृतीयपंथी, गरोदर माता, अंथुराणावर असलेल्यांचा समावेश आहे. तसेच, परदेशी शिक्षणासाठी जाणारे विद्यार्थी आणि औद्योगीक क्षेत्रातील कामगारांसाठी लसीकरण मोहीम राबविली जात आहे. 9 जुलैपासून गरोदर मातांचे लसीकरण सुरू झाले आहे.
आतापर्यंत जिल्ह्यात एकूण 10 हजार 827 गरोदर महिलांना लस देण्यात आली आहे. त्यामध्ये पुणे शहरात 4 हजार 468, पिंपरी-चिंचवडमध्ये 1 हजार 229 तर, ग्रामीणमध्ये सर्वाधिक 5 हजार 130 महिलांना लस देण्यात आली आहे.
तसेच, दिव्यांगांच्या लसीकरणाला गती देण्यात आली आहे. आतापर्यंत 25 हजार 941 जणांचे लसीकरण झाले असून, त्यामध्ये ग्रामीणमध्ये 17 हजार, पुणे शहरात 6 हजार तर पिंपरी-चिंचवडमध्ये 2 हजार जणांचे लसीकरण झाले आहे.