पिंपरी (प्रतिनिधी): पिंपरी-चिंचवड महापालिकेचे तत्कालीन सहायक आयुक्त तथा पुण्याचे अप्पर जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड यांचे आज (गुरुवारी) सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.
अत्यंत कार्यक्षम, मनमिळावू आणि मितभाषी अधिकारी म्हणून साहेबराव गायकवाड हे सर्वांना परिचित होते. माढा तालुक्यातील (जि. सोलापूर) रिधोरे या छोट्याशा गावातील आणि शेतकरी कुटुंबातील असलेल्या साहेबराव गायकवाड यांनी आपल्या कष्टाच्या जोरावर महसूल विभागातील विविध पदांवर काम केले होते. पिंपरी-चिंचवड महापालिकेतही ते सहायक आयुक्त म्हणून चार वर्षे कार्यरत होते. तसेच 2014 च्या विधानसभा निवडणुकीत ते भोसरी विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारीही होते.
सातारा येथे अतिरिक्त जिल्हाधिकारी म्हणून काम केल्यानंतर सप्टेंबर 2019 मध्ये ते पुण्याचे अप्पर जिल्हाधिकारी म्हणून रुजू झाले होते. गेल्याच आठवड्यात त्यांची पिंपरी-चिंचवड महापालिकेत अतिरिक्त आयुक्त म्हणून बदली झाली होती. मात्र या बदलीला विरोध दर्शवित त्यांनी मॅटमध्ये दावा दाखल करीत बदलीला स्थगिती मिळविली होती.
यानंतर त्यांनी पूर्वीच्याच अप्पर जिल्हाधिकारी या पदाचा कार्यभार सांभाळला होता. गुरुवारी सकाळी त्यांना अचानक हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना पुण्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाबद्दल सर्व स्तरातून शोक व्यक्त होत आहे.