शैक्षणिक साहित्य खरेदीसाठी गर्दीच गर्दी
नव्या शैक्षणिक वर्षाचा आजपासून श्रीगणेशा
पुणे – नवे शैक्षणिक वर्ष मंगळवारपासून सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारी अप्पा बळवंत चौकात पुस्तके, वह्या आदी शैक्षणिक साहित्याच्या खरेदीसाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती. अनेक दुकानांमध्ये रांगा लागल्याचेदेखील चित्र होते. यामुळे अप्पा बळवंत चौकातील रस्तादेखील “ब्लॉक’ झाला होता.
मागील वर्षी करोनामुळे शाळा बंद असल्याने शालेय पुस्तक आणि साहित्य विक्रीवर परिणाम झाला होता. यंदादेखील मंगळवारपासून शाळा, महाविद्यालये ऑनलाइन सुरू होत आहेत. त्यामुळे पूर्वसंध्येला शैक्षणिक साहित्य आणि पुस्तकांच्या खरेदीसाठी बाजारपेठांमध्ये गर्दी वाढली होती.
दरवर्षी 15 जूनपासून शाळा, महाविद्यालये सुरू होतात. त्यामुळे शैक्षणिक साहित्याच्या खरेदीसाठी आठवडाभर आधीपासून गर्दी होण्यास सुरुवात होते. यंदा मात्र हे प्रमाण तुलनेने कमी होते. त्यामुळे खरेदीला अल्प प्रतिसाद मिळत असल्याचे सांगण्यात येत होते. परंतु, सोमवारी ग्राहकांची संख्या वाढल्याने व्यापाऱ्यांकडूनदेखील समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
सोमवारी सकाळपासून बाजारपेठांमध्ये विद्यार्थी आणि पालकांची वह्या, पुस्तके आणि शैक्षणिक साहित्याच्या खरेदीसाठी लगबग सुरू झाली होती. पाल्याच्या अभ्यासासाठी पालकांकडून विविध बाबींची खरेदी करण्यात येत आहे. याशिवाय दुकानांच्या बरोबरीने पुस्तकांच्या लहान स्टॉलवरदेखील ग्राहकांची गर्दी होत आहे.
ट्रॅफिक जाम ठरलेलेच!
अपुरे पार्किंग, रस्त्यावर उभी केलेली वाहने, रस्त्याच्या कडेला असणारे पुस्तकांचे स्टॉल आणि पादचाऱ्यांची गर्दी यामुळे अप्पा बळवंत चौकाकडून तांबडी जोगेश्वरी मंदिराकडे जाणारा ब्लॉक झाला होता. या रस्त्यावरच हाकेच्या अंतरावर वाहतूक विभाग असूनही, वाहतूक नियमनासाठी पोलिसांची संख्या तुलनेने कमी होती. त्यामुळे वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
पुस्तकांचे ऑनलाइन बुकिंग
आता सर्व व्यावसायिकांनीही ऑनलाइन ऑर्डर घेणे सुरू केले आहे. त्यामुळे ग्राहकांची गर्दीही कमी होते. काही पालकांनी थेट विक्रेत्यांशी संपर्क साधत, पुस्तके “बुक’ केली होती. गर्दी टाळण्यासाठी पालकांनी हा पर्याय निवडला.