पुणे – लॉकडाऊनमधील नियमांतील अनेक बाबींना सोमवारी शिथिलता मिळाली. याशिवाय आस्थापना, दुकानांच्या वेळादेखील वाढवण्यात आल्या. याचा परिणाम गर्दीवर झाला. यादरम्यान मास्क, सोशल डिस्टन्सिंग या करोना प्रतिबंधक नियमांचा पुणेकरांना विसर पडला होता.
नव्या नियमावलीनुसार शहरातील विविध प्रकारची दुकाने, हॉटेल, आस्थापना आदीची वेळ सोमवारपासून वाढवण्यात आली. त्यामुळे खरेदीसाठी ग्राहकांची वर्दळ वाढली. दुकानांसह मॉल्स, हॉटेल्स आदीमध्ये येणाऱ्या नागरिकांची संख्यादेखील अधिक होती.
लॉकडाऊननंतर एकाच वेळी होणारी गर्दी टाळण्यासाठी आणि बाधितांची संख्या वाढू नये, या अनुषंगाने प्रशासनाने टप्प्याटप्प्याने निर्बंध शिथिल केले, तर नियमांचे पालन न केल्यास पुन्हा एकदा प्रशासनाने लॉकडाऊनचे संकेत दिले आहेत. असे असतानाही बाजारपेठांमध्ये नियमांकडे मात्र दुर्लक्ष करण्यात येत होते.
सूचना फलक शोभेसाठीच!
सोमवारी मंडई, रविवार पेठ, तुळशीबाग, कॅम्पसह उपनगरांतही गर्दी झाली होती. यावेळी दुकानांमध्ये “नो मास्क, नो एन्ट्री’ अशा आशयाचे फलक लावले होते, दुकानाबाहेर सॅनिटायझरचीदेखील व्यवस्था केली होती. मात्र, करोना प्रतिबंधात्मक नियमांचे अनेक ठिकाणी पालन करण्यात येत नसल्याचे चित्र होते. याकडे व्यावसायिकांनी लक्ष देणे गरजेचे आहे.
मास्कचा सोयीस्कर वापर
काही दुकानांमधील कामगार वर्ग आणि ग्राहकदेखील मास्कचा सोयीस्कर वापर करत होते. याशिवाय काही ठिकाणी मोठ्या संख्येने गर्दी झाल्याने सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला होता. करोनाचा धोका अद्यापही टळलेला नसताना, नियमांचे उल्लंघन करणे म्हणजे तिसऱ्या लाटेला आमंत्रण देण्यासारखेच असल्याची चर्चादेखील दबक्या आवाजात नागरिकांमध्ये सुरू होती.