पुणे – निवडणूक काळात गुन्हेगारीला लगाम; 1,352 गुंडांवर धडक कारवाई

पुणे – निवडणूक कालावधीत कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होऊ नये, यासाठी पुणे शहर पोलिसांनी कंबर कसली आहे. मागील दोन-तीन महिन्यांपासून सराईत गुन्हेगारांची झाडाझडती घेण्यात येत आहे. त्यांच्यावर एमपीडीए (महाराष्ट्र प्रिव्हेन्शन ऍक्‍क ऑफ डेंजरस ऍक्‍टिव्हिटीज ऍक्‍ट), तडिपारी, “मोक्का’ अंतर्गत प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येत आहे. पुणे पोलिसांनी 26 मार्च अखेरपर्यंत शहरात 1 हजार 352 गुंडांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. याचा परिणाम म्हणून गुन्हेगारीलाही लगाम बसला आहे.

नववर्षाच्या सुरवातीलाच खून सत्रांमुळे शहर ढवळून निघाले होते. यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले होते. याची गांभिर्याने दखल घेत गुन्हे शाखेने स्थानिक पोलिसांच्या मदतीने शहरातील कासेवाडी, भवानीपेठ, जनता वसाहत, पर्वती पायथा, कोथरूड, सिंहगड रोड भागात कोम्बिंग ऑपरेशन राबवून गुन्हेगारांची झाडाझडती घेतली होती. तसेच सराईत गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाईचा बडगा उगारला. यानंरत निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर उरलेल्या सराईत गुन्हेगारांवर कारवाई सुरू आहे. लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने दि.26 मार्चपर्यंत 1 हजार 352 गुंडांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. डिसेंबर 2018 अखेर पोलिसांच्या रेकॉर्डवरील 113 गुन्हेगारांना शहर आणि जिल्ह्यातून एक तसेच दोन वर्षांच्या कालावधीसाठी तडीपार केले होते. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर 2019 मध्ये तीन महिन्यांत 108 गुंडांवर तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे. यासोबतच 2018 मध्ये एमपीडीए अंतर्गत 14 जणांवर कारवाई करून त्यांना कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे.

येरवड्यात सर्वाधिक कारवाई
येरवडा पोलीस ठाण्यांतर्गत सर्वाधिक 140 गुंडांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. त्यापाठोपाठ भारती विद्यापीठ 118, सिंहगड रोड 90 दत्तवाडी 86 जणांवर तसेच सर्वांत कमी कारवाई चंदननगर 4 आणि विश्रामबाग 7 पोलीस ठाण्याच्या हद्दीत झाली आहे.

प्रचारमोहिमा, सभा, मतदानप्रक्रिया आदींमध्ये गुन्हेगारी कृत्यांमुळे अडथळे निर्माण होण्याची शक्‍यता असते. शांततामय आणि निर्भिड वातावरणात निवडणुका पार पडण्यासाठी पोलिसांनी हे पाऊल उचलले आहे. आगामी काळातही गुन्हेगारांवर अशाचप्रकारे प्रतिबंधात्मक कारवाई सुरू ठेवणार आहे
लोकसभा निवडणुका शांततेत व्हाव्यात, यासाठी
– शिरीष सरदेशपांडे, पोलीस उपायुक्त, गुन्हे शाखा

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.