पुणे – गॅस एजन्सी व्यवस्थापकाकडे दोन लाख रुपये व पाच हजार रुपये दरमहा हप्ता अशा खंडणीची मागणी केली. त्यापैकी दोन लाख रुपये घेणाऱ्या कथित पत्रकारांना खंडणी विरोधपथकाने अटक केली. ही कारवाई मार्केट यार्ड येथे करण्यात आली.
सुहास बनसोडे, मोईन चौधरी व वसीम शेख अशी संशयितांची नावे आहेत. याप्रकरणी योगेश शिंदे यांनी तक्रार दिली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, “तक्रारदार शिंदे हे येरवडा-शांतीनगर भागात सम्यक इंडेन गॅस एजन्सीचे व्यवस्थापक आहेत. नागरिक तेथून त्यांच्या वाहनातून सिलिंडर नेतात. याचे व्हिडिओ चित्रीकरण मोईन व वसीम यांनी केले. त्यानंतर संबंधित व्हिडिओ, छायाचित्रे शिंदे यांना दाखवून त्यांनी “गॅसची डिलिव्हरी घरपोच करायची असताना, तुम्ही ते करत नाहीत. तुमची एजन्सी बंद करण्याबाबतची तक्रार इंडियन ऑइलला दिली आहे. ती मागे घ्यायची असल्यास दोन लाख रुपये द्या. तसेच दरमहा पाच हजार रुपये हप्ता द्या,’ असे म्हणत सम्यक संपादक पत्रकार संघ अध्यक्ष सुहास बनसोडे, चौधरी व शेख या तिघांनी खंडणी मागितली.
त्यानुसार त्यांनी खंडणी विरोधी पथकाकडे (क्रमांक दोन) तक्रार अर्ज दिला. संबंधितांवर कारवाई करण्याचा आदेश मिळाल्यानंतर पोलिसांनी मार्केटयार्ड प्रवेशद्वार 9 जवळ सापळा रचला. त्यानुसार तिघांना दोन लाख रुपयांची खंडणी घेताना अटक केली.