पुणे -सेनापती बापट रस्ता आणि विधी महाविद्यालय रस्त्यावरील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी बालभारती ते पौड फाटा रस्ता प्रस्तावित आहे. हा रस्ता बांधकाम व्यावसायिकांसाठी केला जात असल्याचा आरोप केला जात असला, तरी प्रत्यक्षात या 1.7 किलोमीटरच्या रस्त्याला एकही जोडरस्ता नसल्याचे महापालिकेकडून सांगण्यात आले.
तर, ज्या सर्वे क्रमांक 44 साठी हा रस्ता केला जात असल्याचा आरोप होत आहे, त्या स.नं 44 च्या अर्ध्या भागात हा रस्ता तब्बल 25 फूट उंच (उन्नत) आहे. तर येथे कुठेही रॅम्प नाही. उर्वरित भागात जिथे रस्ता पौड रस्त्याला जोडला जातो, तिथे डोंगराचा ओबडधोबड भाग असून तो कुठेही या सर्व्हे क्रमांकाला जोडणेच शक्य नसल्याचे प्रशासनाने म्हटले आहे. पूर्वी या रस्त्यासाठी मोठ्या प्रमाणात वृक्षतोड केली जाणार असल्याचे सांगण्यात येत होते. पालिकेने यावर खुलासा केल्यानंतर आता बांधकाम व्यावसायिकांसाठी हा रस्ता केला जात असल्याचा आरोप होत आहे. याबाबत विचारणा केली असता जोडरस्ता नसल्याचे सांगण्यात आले.
आणखी रस्ता देणे शक्य नाही…
ज्या सर्वे क्रमांक 44 चा उल्लेख करत हा रस्ता आहे, असे सांगण्यात येत आहे. त्या सर्वे क्रमांक 44 ला जाण्यासाठी पौड रस्त्यावरील मासळी बाजाराच्या बाजूने स्वतंत्र रस्ता आहे. या शिवाय, पौड फाटा फुटतो तिथून एक स्वतंत्र रस्ता असून एआरएआयच्या रस्त्यावरूनही स्वतंत्र रस्ता आहे. तर बालभारती पौड रस्ता आधीच उंच असल्याने तेथून आणखी एक रस्ताच देणे शक्य नसल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट केले जात आहे.
1 किलोमीटर रस्ता उन्नत
हा प्रस्तावित रस्ता 1.7 कि.मी.चा आहे. त्यातील 700 मीटर रस्ता बालभारतीसमोरून ते विधी महाविद्यालय रस्त्याबाजूला कांचन गल्लीपर्यंत हा रस्ता जमिनीवरून असून तेथून तो इलिवेटेड (उन्नत) असेल. तो थेट सर्व्हे क्रमांक 44 च्या अर्ध्यापेक्षा अधिक भागात या रस्त्यांची उंची जमिनीपासून 8 मीटर (24 ते 25 फूट) असेल. पुढे हा रस्ता पौड रस्त्याबाजूला उतरावर असेल. हा भाग टेकडीच्या तीव्र उतरावर तसेच ओबडधोबड रस्त्याने रस्ता उंचीवरच असेल. त्यामुळे कोणत्याही बांधकाम व्यावसायिक अथवा एसआरए प्रकल्पाच्या जागेसही तो जोडलेला नसल्याचे प्रशासकीय सूत्रांनी सांगितले.