पुणे : नव्या बाधितांमध्ये गंभीर रुग्णांची संख्या नगण्य

* महापालिकेच्या साप्ताहिक करोना आढावा अहवालातून बाब समोर
* ऑक्‍सिजनची मागणीही 2.5 टनांवर
दोन आठवड्यात केवळ 4 जणांना भासली व्हेंटीलेटरची गरज

पुणे- शहरातील दुसरी करोनाची लाट ओसरल्याने दैनंदिन बाधितांमधील गंभीर रुग्णांचा आकडा लक्षणीय प्रमाणात घटला आहे. शहरात 7 ते 20 ऑक्‍टोबर या दोन आठवड्यांच्या कालावधीत 1,497 नवीन करोनाबाधित आढळले. त्यातील केवळ 4 जणांना व्हेंटीलेटरची गरज भासली. तर, 20 जणांना ऑक्‍सिजनची गरज भासली असून 10 जणांना आयसीयूमध्ये दाखल करावे लागले. महापालिकेच्या साप्ताहिक करोना आढावा अहवालातून ही बाब समोर आली आहे. दरम्यान, शहरातील ऑक्‍सिजनची मागणीही 2.5 टनांवर आली आहे. दुसऱ्या लाटेत सर्वाधिक 42 टन ऑक्‍सिजन प्रतिदिन नोंदविली गेली होती.

शहरात करोनाच्या दुसऱ्या लाटेने फेब्रुवारी ते जून 2021 अखेरपर्यंत कहर माजविला होता. या कालावधीत शहरातील सक्रिय बाधितांचा आकडा तब्बल 56 हजारपर्यंत गेला होता. त्यानंतर आता गेल्या महिन्याभरापासून करोनाची लाट पूर्णत: ओसरत असून दैनंदिन बाधितांचा दर 1.5 टक्‍क्‍यांवर आला आहे. तर, शहरातील सक्रिय बाधितांचा आकडा गेल्या दीड वर्षात पहिल्यांदाच 1 हजारच्या खाली आहे. मात्र, त्यातही शहरात नव्याने बाधित सापडणाऱ्यांमध्ये गंभीर रुग्णांची तसेच ऑक्‍सिजनची संख्या भासणाऱ्या रुग्णांची संख्या नियंत्रणात असल्याचे समोर आले आहे.

आरोग्य विभागाच्या अहवालानुसार, 7 ते 13 ऑक्‍टोबरदरम्यान शहरात एकूण 823 नवे बाधित आढळून आले होते. त्यातील 150 जणांना रुग्णालयात भरती करण्यात आले असून 125 जणांना ऑक्‍सिजन विरहित बेड, 16 जणांना ऑक्‍सिजन बेड, 6 जणांना आयसीयू बेड तर 3 जणांना व्हेंटीलेटरची गरज भासली होती.

तर, 14 ते 20 ऑक्‍टोबरदरम्यान शहरात 674 नवीन बाधित सापडले असून त्यात, 123 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून 115 जणांना साधे बेड, 3 जणांना ऑक्‍सिन बेड, तर अवघ्या एका रुग्णास व्हेंटीलेटरची गरज भासली आहे. त्यामुळे, नव्या बाधितांमध्ये गंभीर रुग्णांची संख्या कमी असल्याचे सकारात्मक चित्र शहरात आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.