मंगळवारी 293 नवे बाधित ; 150 रुग्णांना डिस्चार्ज, 11 जणांचा मृत्यू
पुणे – शहरात मंगळवारी बधितांचा दहा हजाराचा आकडा पार झाला असून, एकूण संख्या 10,183 झाली आहे. मंगळवारी 293 नवे रुग्ण दाखल झाले असून, मागील 24 तासांत 11 रुग्णांचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्याही 469 झाली आहे. याशिवाय 150 रुग्णांना दिवसभरात घरी सोडण्यात आले आहे.
स्वॅब सॅम्पल्स गोळा करण्याचा वेग वाढवण्यात आला असून त्यामुळे बाधितांची संख्याही वाढण्याची शक्यता आहे. याशिवाय खासगी लॅबमध्येही कमी किंमतीत टेस्ट करण्याचे आदेश राज्य सरकारने दिल्याने जास्तीत जास्त बाधित “डिटेक्ट’ होण्याची शक्यता आहे. मंगळवारी 2,547 सॅम्पल्स गोळा करण्यात आले.
दरम्यान, शहरातील विविध रुग्णालये आणि विलगीकरण कक्षातून बरे झालेल्या 150 रुग्णांना घरी सोडण्यात आले. या रुग्णांचा समावेश करून आतापर्यंत सुमारे 6 हजार 596 नागरिकांना घरी सोडण्यात आले आहे. तर, रुग्णालयात सध्या उपचार घेत असलेल्या “ऍक्टिव्ह’ रुग्णांची संख्या 3 हजार 118 असून, 213 रुग्णांची प्रकृती गंभीर आहे. यापैकी 41 जणांना व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आले आहे. तर, 9 हजार 299 जणांना क्वांरन्टाइन करण्यात आले असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.