फुरसुंगी – पुणे महानगरपालिकेकडून फक्त गावापूरती कर आकारणी करताना मनपा हद्दीतील रेडीनेकर प्रमाणे कर आकारणी करण्यात आली आहे. उरूळी आणि फुरसुंगीचा रेडीरेकनर दर ग्रामपंचायतीच असताना त्यानुसार कर आकारणी करणे गरजेचे आहे. परंतु, कर आकारणी हडपसर रेडी रेडीरेकनर प्रमाणे केली जात आहे. 2017 मध्ये समाविष्ट झालेल्या गावांत ग्रामपंचायत प्रमाणे कर आकरणी करण्यात यावी, असा नियम असताना महापालिकेने शहरी रेडीरेकनर प्रमाणे कर आकारणी थांबवावी, अशी मागणी उरूळी देवाची संघर्ष समितीकडून करण्यात आली असून याबाबत आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे.
महापालिकेने वाढीव तसेच चुकीच्या पद्धतीने लादण्यात आलेला कर रद्द करावा. यासाठीचे निवेदन सभागृह नेते गणेश बिडकर व स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांना उरूळी देवाची संघर्ष समितीच्यावतीने देण्यात आले आहे. या निवेदनात दिलीप भाडळे यांनी वाढीव कर आकारणीमुळे शेतकरी, नागरिक तसेच व्यावसायिकांच्या व्यथा मांडल्या आहेत. व शासनाच्या काही गोष्टी चुकीच्या कशा आहेत याकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.
पुणे महानगरपालिकेमध्ये 2017 मध्ये समाविष्ट झालेल्या गावांचे निवासी व व्यवसायिक मिळकत कराची आकारणी चुकीच्या पद्धतीने व अन्यायकारकरित्या केली जात आहेत. उरुळी देवाची व फुरसुंगी ही गावे पालिकेत समाविष्ट करण्याअगोदर उरुळीदेवाची ग्रामस्थांनी ग्रामसभेमध्ये पुणे मनपाला काही अटी व नियम घालून गाव समावेशाला सहमती दर्शविली होती. परंतु, या अटी व नियमांचे पालन महानगरपालिकेने केलेले नाही.
या गावांमध्ये शेतीबरोबरच शेतकऱ्यांना छोट्या-मोठ्या गोदामातून व्यवसायीक उत्पन्न मिळते. परंतु, याचा कोणताही विचार न करता पालिकेने वाढीव कर आकारणी सुरू केली आहे. यातून गोदामा सारखे उद्योग बंद पडण्याच्या स्थितीमध्ये आहेत.
आमचे गाव गेली 25 वर्ष कचरा डेपोबाधीत आहे. तरी आम्हाला ग्रामपंचायत प्रमाणे कर आकरावा. यावर बिडकर व रासने यांनी सकारात्मकता दाखवत सर्व विषय सभागृहामध्ये घेऊन योग्य वेळी कर कमी करण्याबाबत संमती दर्शविली आहे. यावेळी नगरसेवक मारुती तुपे, दिलीप भाडळे, कपिल भाडळे, धनंजय कामठे, रमेश भाडळे, परदेशी आदी उपस्थित होते.