पुणे – शहरातील वाहतूक समस्या सोडविण्यासह महिलांच्या सुरक्षिततेला पुणे पोलिसांकडून विशेष प्राधान्य दिले जाणार आहे. त्यासोबत कायदा व सुव्यवस्था राखणे, बालकांची सुरक्षितता, सायबर आणि आर्थिक गुन्हेगारी रोखण्यासाठी प्रयत्न केले जाणार असून दुचाकीस्वारांना हेल्मेटचा वापर करावा, यासाठी आम्ही ठोस उपाययोजना राबविण्यात येण्याचे प्रतिपादन नवनियुक्त पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पत्रकार परिषदेत केले आहे. पुण्याचे तत्कालीन पोलीस आयुक्त रितेश कुमार यांच्याकडून त्यांनी गुरुवारी संध्याकाळी पदभार स्वीकारला.
अमितेशकुमार म्हणाले, पुण्यातील वाहतूक व्यवस्था सुस्थितीत करण्यासाठी लक्ष केंद्रित केले जाणार आहे. बेशिस्त वाहन चालकांसह नियमभंग करणाऱ्या चालकांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येणार आहे. त्यासोबत महिला, मुली, शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी योग्य ती अंमलबजावणी केली जाणार आहे. कोयता गॅंग, अल्पवयीन गुन्हेगारी, सराईत टोळ्यांवर अंकुश ठेवण्यासाठी कारवाईचा बडगा कायम ठेवला जाणार आहे. विशेषतः बेसिक पोलिसिंग करून सर्वसामान्य नागरिकांना न्याय देण्यासाठी आम्ही प्राधान्य देणार आहोत. कायदा सुव्यवस्था व्यवस्थित सुरू ठेवण्यासाठी जे काही आम्हाला करावे लागेल त्याबाबत कोणतीही तडजोड करणार नाही.
दुचाकी चालविताना हेल्मेट गरजेचे, बेशिस्तविरुद्ध कारवाई होणार – आयुक्तांचा इशारा
दुचाकी चालविताना हेल्मेट वापरणे महत्त्वाचे आहे. ते परिधान करणे आवश्यक आहे. त्याबाबत कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी आणि वाहतूक सुरळीत करण्यासाठी आम्ही सर्वोत्तम प्रयत्न करणार आहोत. त्याशिवाय ट्रिपल सीट प्रवास, विरुद्ध दिशेने वाहन चालविणे, वाहतूक नियमभंग करणाऱ्या विरुद्ध कारवाई केली जाणार असल्याचा इशारा पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी दिला आहे. त्यामुळे आता पुण्यात दुचाकीस्वार चालकांना हेल्मेट वापरणे बंधनकारक होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.