हडपसर (विवेकानंद काटमोरे) – खासगी ट्रॅव्हल्स बसेस कंपन्यांनी हडपसरमध्ये मुख्य रस्त्यावरच अनधिकृत घेतलेले थांबे वाहतूक कोंडीस कारणीभूत ठरत आहेत. याकडे वाहतूक पोलिसांचे लक्ष नसल्याने या रस्त्यांवर अपघातांची भीती आहे. यापूर्वी काही वेळा दोन बसमध्ये अडकून अपघातही झाले आहेत. वाहतूक पोलीस येथे असतानाही तासन्तास या खासगी बसेस वाहतुकीस अडथळा करून उभ्या असतात. त्यामुळे नियम पालन आणि कारवाईबाबत शंका व्यक्त केली जात आहे.
पुणे-सोलापूर महामार्ग हा वर्दळीचा आहे. त्यामुळे सदैव वाहतूक कोंडी असते. रात्री 8 ते 12 वाजेपर्यंत या बसेस रस्त्याच्या एक तृतीयांश भागापर्यंत उभ्या असतात. त्यामुळे वाहनचालक आणि सोसायटीधारकांना ये-जा करताना वादाला तोंड द्यावे लागत आहे. खासगी बसेसना दुसरीकडे थांबे द्यावेत, नियम न पाळणाऱ्यांवर कारवाई करावी, अनधिकृत थांबे हद्दीबाहेर न्यावेत, वैयक्तिक मालकीची जागा भाड्याने घेऊन तेथूनच या बसेस सोडाव्यात अशा अनेक उपाययोजनांवर पोलीस, लोकप्रतिनिधी, पत्रकार व तज्ज्ञांच्या उपस्थितीत वारंवार चर्चा व बैठका घेतल्या गेल्या. मात्र, त्यानतर अवघ्या आठवड्यात पुन्हा या बसेस मुख्य रस्ताच गिळंकृत करत आहेत. यामुळे सामान्य वाहनचालकांचा मात्र कोंडमारा होत असून, अनेकदा हमरी-तुमरीचे प्रसंगही उद्भवत आहेत. त्यामुळे प्रशासनाने गांभीर्याने या प्रश्नावर तोडगा काढावा, अशी मागणी हडपसर परिसरातून केली जात आहे.
वाहतूक कोंडीचे “हॉटस्पॉट’
मगरपट्टा चौक व पुढे सावली कॉर्नर, आर्यन सेंटर, गाडीतळ पीएमपी बिल्डिंग, हॉटेल प्रणामसमोर, रविदर्शन, हडपसर आकाशवाणी आणि पंधरा नंबर चौकाच्या अलिकडे येथे या खासगी बसेस थांबतात. त्यामुळे चौकात वाहनांच्या रांगा लागत असून, त्यामुळे हा रस्ता वाहतुकीसाठी धोकादायक झाला आहे.
उड्डाणपूल दुरुस्तीमुळेही खोळंबा
हडपसर उड्डाणपूल दुरुस्तीमुळे या चौकातील वाहतूक आधीच विस्कळीत आहे. त्यातच खासगी बसेसमुळे सावली कॉर्नर, गाडीतळ व रविदर्शन चौक जॅम होतो. या भागात वाहनांना अडकून पडावे लागते. या बसेस सिग्नलच्या पुढे किंवा मागे थांबतात. आकाशवाणी व त्यापुढे मुख्य रस्त्यालगत थांबणाऱ्या बसमुळे येथे अपघाताची शक्यता आहे.
मगरपट्टा चौक ते पंधरा नंबरपर्यंत ट्रॅव्हल्स बसेस थांबतात. त्यामुळे रात्री ट्रॅफिक जॅम असते. या सर्व ट्रॅव्हल्सला आकाश लॉन्स चौकापुढे लोणी काळभोर टोल नाक्याजवळ किंवा पुढे डाव्या बाजूला थांबा केला, तर कोंडी आणि अपघात होणार नाहीत.
– दीपक कुदळे, संस्थापक, प्रजाहितम संघटना
नोबेल हॉस्पिटलमागील वाहनतळावर किंवा गाडीतळ येथील डीपी रोडवर या बसेसला माफक दरात थांबवण्यासाठी व्यवस्था करावी. तेथे जागा उपलब्ध होऊ शकते. पुणे-सोलापूर महामार्गावर कोणतीही लक्झरी टुरिस्ट गाड्या, टेम्पो ट्रॅव्हलर, खाजगी वाहतूक करणारी वाहने थांबून देऊ नयेत.
– गणेश वाडकर, स्थानिक नागरिक
एसटी बस संपामुळे अवैध प्रवासी वाहतूक कारवाई करता येत नाही. मात्र, नो पार्किंग, वाहतुकीस अडथळा अशी नियमित कारवाई करून सुमारे एक ते दीड हजार रुपये दंड वसूल केला जात आहे. ट्रॅव्हल्स येथे थांबवू नयेत, यासाठी नोटीस देण्यात आल्या आहेत. पोलीस कर्मचारी या ट्रॅव्हल्स बसचालकांना नियमित सूचना देतात. पुन्हा एकदा कडक कारवाई करून रस्ता पूर्णपणे मोकळा ठेवण्यासाठी प्रयत्न केले जातील.
– मनीषा झेंडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, हडपसर वाहतूक शाखा