हडपसर – सुमारे 6 वर्षांपूर्वी उद्घाटन होऊनही बंदच असलेला हडपसर येथील कै. रामचंद्र अप्पा बनकर क्रीडा संकुलातील जलतरण तलाव खुला करावा, याबाबत पुणे शहर कॉंग्रेस ओबीसी विभागाचे अध्यक्ष प्रशांत सुरसे यांनी निवेदन दिले आहे. याबाबत आयुक्तांनी सकारात्मक भूमिका घेतल्याचे सुरसे यांचे म्हणणे आहे.
या क्रीडा संकुलातील जलतरण तलाव, बॅडमिंटन हॉल, व्यायाम शाळा आदी सुविधा नागरिकांसाठी खुल्या कराव्यात, अशा मागण्या निवेदनाद्वारे मांडण्यात आल्या. यावर आयुक्तांनी दखल घेत जलतरण तलाव खुला करावा, देखभालीसाठी तातडीने निविदा मागवाव्यात अशा सूचना अतिरिक्त आयुक्त विलास कानडे यांना दिल्या. यावेळी हडपसर विधानसभा कॉंगेस कमिटीचे अध्यक्ष प्रा. शोएब इनामदार, पल्लवी सुरसे, नंदकुमार अजोतिकर आदी उपस्थित होते. महापालिकेने 2016 मध्ये या क्रीडा संकुलाचे लोकार्पण केले. संकुलात आर.आर.पाटील जलतरण तलाव कोट्यवधी रुपये खर्चून बांधलेला हा प्रकल्प पाच वर्षे बंदच ठेवण्यात आलेला आहे. त्याच्या देखभालीसाठी 30 लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत.