मुंबई : राज्यसभा निवडणुकीच्या घडामोडीवरून राज्यात राजकीय नाट्य पाहायला मिळत आहे. श्रीमंत शाहू महाराजांनी छत्रपती संभाजीराजेंवर टीका करत शिवसेनेची बाजू घेतल्याने या प्रकरणात नवा वाद सुरु झाला आहे. या सर्व घडामोडी घडत असताना आता आणखी एका भेटीमुळे राज्यातील राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
संभाजीराजे छत्रपती आणि आणि शिवेंद्रसिंहराजे यांची साताऱ्यात भेट झाली आहे. राष्ट्रीय महामार्गावर खिंडवाडी येथे या दोघांची धावती भेट झाली. यामुळे भविष्यात दोन्ही राजे एकत्र येऊन राज्याच्या राजकारणात लक्ष घालणार असल्याच्या चर्चा रंगत आहेत. मात्र दोन्ही राजेंच्या भेटीने चर्चांना उधाण आले आहे.
काही दिवसांपूर्वी संभाजीराजेंचा गेम केला असल्याचं वक्तव्य आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी केले होते. यावर संजय राऊत आणि गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी शिवेंद्रसिंहराजेंना प्रत्युत्तर देत आगीत तेल ओतू नये अशी टीका केली होती.
राज्यसभेच्या निवडणुकीसाठी भाजपाने केंद्रीय वाणिज्यमंत्री पीयूष गोयल, माजी कृषी मंत्री डॉ. अनिल बोंडे आणि कोल्हापूरचे माजी खासदार धनंजय महाडिक यांना उमेदवारी जाहीर केली. डॉ. बोंडे यांना उमेदवारी देऊन भाजपाने राजकीय आरक्षण रद्द झाल्याने संतप्त भावना असलेल्या इतर मागासवर्ग समाजाला (ओबीसी) आपलेसे करण्याचा प्रयत्न केला आहे.