पुणे – शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने शिवजयंतीनिमित्त आयोजित करण्यात येणारी मिरवणूक यंदा करोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात येणार आहे. सालाबादप्रमाणे “एसएसपीएमएस’ येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारुढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात येणार आहे.
दरवर्षी शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने शिवजयंती सोहळ्याचे आयोजन करण्यात येते. यामध्ये ऐतिहासिक स्वराज्यघराणी, सरसेनापती, सरदार, सुभेदार, वीर मावळे आणि वीर मातांच्या 100 स्वराज्यरथांचा सहभाग असतो. परंतु, यावर्षी करोनाच्या पार्श्वभूमीवर मिरवणूक न काढण्याचा निर्णय समितीने घेतला आहे.
दरवर्षीप्रमाणे शनिवारी (19 फेब्रुवारी) लालमहाल येथील माता जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाला पुष्पहार अर्पण करून, त्यानंतर “जिजाऊ मॉंसाहेब शहाजी महाराज शिवज्योत’ लालमहाल ते “एसएसपीएमएस’ संस्थेपर्यंत जाणार आहे. यासह सकाळी 11 वाजता हेलिकॉप्टने पुष्पवृष्टी करून मानवंदना देण्यात येणार आहे, अशी माहिती समितीचे संस्थापक अध्यक्ष अमित गायकवाड यांनी दिली.