पुणे – राज्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये पवित्र पोर्टल प्रणालीद्वारे शिक्षक भरती करण्यात येणार असून या भरतीसाठी शाळांची बिंदूनामावली (रोस्टर) अद्ययावत करण्याची कार्यवाही वेळेत पूर्ण करून घेण्याची आवश्यकता निर्माण झालेली आहे. शिक्षक भरतीसाठी फेब्रुवारी-मार्च 2023 मध्ये शिक्षक अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेतील गुणवत्तेनुसार जिल्हा परिषदेच्या शाळांमधील शिक्षक भरतीची कार्यवाही सुरू झालेली आहे.
शिक्षक भरतीसाठी शिक्षकांची विषय व आरक्षणनिहाय रिक्त पदांची माहिती तयार असणे गरजेचे आहे. संच मान्यता, बिंदुनामावली अद्ययावत करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यासाठी बैठकही झाली आहे. त्या अनुषंगाने शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी राज्यातील सर्व जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना आदेशही बजाविले आहेत. शिक्षक भरतीच्या कार्यवाहीचा अहवाल वेळोवेळी सादर करावा लागणार आहे. याबाबत 25 जुलै रोजी आढावा बैठकही घेण्यात येणार आहे.
मागासवर्गीय कक्षाकडून बिंदूनामावली तपासताना योग्य ती दक्षता घ्यावी लागणार आहे. बिंदूनामावलीची तपासणी वेळेत होण्यासाठी उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यावर जबाबदारी द्यावी व अन्य मनुष्यबळाची मदत घेवून कार्यवाही तातडीने पूर्ण करण्याच्या सूचनाही सूरज मांढरे यांनी दिल्या आहेत.
राज्यातील जिल्हा परिषद शाळांच्या संच मान्यतांची स्थिती
एकूण जिल्हा परिषद शाळा – 59,997
संच मान्यता पूर्ण झालेल्या शाळा -54,193
संच मान्यता अपूर्ण असलेल्या शाळा -5804
एकुण विद्यार्थी – 2,10,87,570
आधार वैध विद्यार्थी – 1,94,51,315
आधार वैध करण्यास अडचणी असलेले विद्यार्थी – 58,000