पुणे – बांधकाम व्यावसायिकाने कर्जासाठी दिलेल्या फाइलचा स्टेट बँक ऑफ इंडियाच्या व्यवस्थापकाने दुरुपयोग करुन परिचितांचे कर्ज मंजूर घेतले. याव्दारे त्याने बांधकाम व्यावसायिकाची तब्बल १३ कोटी रुपयांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी व्यवस्थापकासह चौघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एका ३४ वर्षीय बांधकाम व्यवसायीकाने दिलेल्या तक्रारीनुसार विजय रायकर, महेश नलावडे, एक महिला आणि व्यवस्थापक शाहबाज जाफर यांच्याविरुद्ध फसवणुकीसह इतर कलमाअंतर्गत बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी साई प्लॅटेनिअम व्हेंचरच्या नावाने २०१९ मध्ये हिंजवडी येथे ७१ गुंठे जागा विकसनासाठी घेतली. त्यावर बांधकाम कर्ज घेण्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या पिंपरी शाखेत व्यवस्थापक शाहबाज जाफर याच्याकडे कागदपत्रे जमा केली.
ही फाइल शाहबाजने स्वतःकडे ठेवत फर्मच्या नावे प्रोजेक्टवर काहीही बांधकाम झालेले नसताना ते झाल्याचे दर्शवले. यानंतर फियादी यांच्या नावे बनावट कागदपत्रे जोडली. तसेच त्यांच्या बनावट स्वाक्षरी केल्या. यानंतर परस्पर २५ कोटी रुपयांचे प्रोजेक्ट कर्ज मंजूर करुन त्यातून ओळखीच्या बांधकाम व्यावसायिकाच्या बॅंक खात्यात रक्कम वर्ग केली.
मात्र, पुन्हा साई प्लॅटेनियम व्हेंचर फर्मच्या खात्यात कोणतीही रक्कम जमा न केल्याने बँकेकडून १०.४४ कोटी रुपये कर्ज थकबाकीची नोटीस फिर्यादींना मिळाली. तसेच थकित कर्जावरील व्याजाची रक्कमही फिर्यादी यांच्या कर्ज खात्यातून वर्ग झाली. या चारही आरोपींनी मिळून तब्बल १३ कोटी रुपयांची फसवणूक केली आहे. याप्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक सुनील वैरागकर करत आहेत.
बॅंक व्यवस्थापक निलंबित
यातील फिर्यादीने जागेचा व्यवहार होईपर्यंत बँकेला कर्ज प्रकरणासाठी २०२० मध्ये कागदपत्रे दिली होती. करोना काळात काही व्यवहार झाला नाही. यामुळे कर्ज प्रकरण करण्याची गरज भासली नाही. दरम्यान, फिर्यादीने त्यांचे एरंडवणे येथील कार्यालय कोंढवा येथे नेले. तेथे त्यांना कर्ज थकविल्याची बँकेची तीन पत्रे मिळाली. दरम्यान त्यांनी बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क केल्यावर व्यवस्थापक जाफर याला निलंबित करण्यात आले आहे.