पुणे – ‘महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटी’ आणि आझम कॅम्पसमधील संलग्न संस्थांच्या वतीने महात्मा फुले पुण्यतिथीनिमित्त काढण्यात आलेल्या अभिवादन मिरवणुकीत १० हजार विद्यार्थी सहभागी झाले. ही मिरवणूक आझम कॅम्पस ते महात्मा फुले वाडा मार्गावर काढण्यात आली.
मिरवणुकीचा शुभारंभ संस्थेचे अध्यक्ष तसेच डॉ. पी.ए.इनामदार युनिव्हर्सिटीचे कुलपती डॉ. पी.ए.इनामदार यांच्या हस्ते झाले. संस्थेचे सचिव इरफान शेख, शाहीद इनामदार, मशकूर शेख, साबीर शेख, सिकंदर पटेल, आसीफ शेख,वाहिद बियाबानी, गौस शेख अब्दुल वहाब, युसुफ शेख, प्राचार्य, मुख्याध्यापक, कर्मचारी सहभागी झाले.
पुणे शहर, जिल्हा काँग्रेसतर्फे अभिवादन
महात्मा जोतिबा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने काँग्रेस भवन येथे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी शिंदे आणि माजी आमदार दीप्ती चवधरी यांचे भाषण झाले. यावेळी दत्तात्रय उभे, द. स. पोळेकर, रोहित लभडे विजय मोहिते, उषा राजगुरू आदी उपस्थित होते.
माळी महासंघाच्या वतीने रॅली
माळी महासंघाच्या वतीने रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. आमदार रवींद्र धंगेकर यांच्या हस्ते गंज पेठेतील महात्मा फुले यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. माजी आमदार कमल ढोलेपाटील आणि दीप्ती चवधरी यांच्या हस्ते मशाल ज्योत पेटवून रॅलीची सुरूवात झाली. ही रॅली म. फुले मंडई येथे म. फुले यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून समाप्त करण्यात आली. यामध्ये दीपक जगताप, स्मिता लडकतत, गिरीश झगडे, राजेंद्र लडकत आदी सहभागी झाले होते.