पुणे : पशुवैद्यकीय संस्थेकडे वीजबिलाचे 88 लाख रुपये थकले

पशुवैद्यकीय संस्थेला महावितरणकडून नोटीस
पुणे –
औंध येथील पशुवैद्यकीय संस्थेकडे मागील एक वर्षांपासूनची वीजबिलाची सुमारे 88 लाखांची थकबाकी आहे. वारंवार पत्र देऊनही संस्थेने पूर्ण वीजबिलाचा भरणा केला नाही. त्यामुळे महावितरणने पशुवैद्यकीय संस्थेला नोटीस बजावली असून वीजबिल न भरल्यास वीजपुरवठा खंडित करण्याचा इशारा दिला आहे.

पशुवैद्यकीय संस्थेकडे वीजबिलापोटी 88 लाख 36 हजार रुपयांची थकबाकी आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून पाठपुरावा करूनही वीजबिलांची थकबाकी भरली जात नाही. मागील महिन्यात संस्थेने थकबाकीपोटी केवळ तीन लाख रुपयांचा भरणा केला आहे. या संस्थेचा सद्यःस्थितीत वीजपुरवठा सुरू असला तरी आर्थिक अडचणीत असलेल्या महावितरणकडून वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई होऊ शकते, अशी माहिती महवितरणच्या अधिकाऱ्यांनी दिली.

महावितरणकडून या संस्थेला वीजबिलांची थकबाकी भरण्यासाठी नियमानुसार वेळोवेळी नोटीस बजावली आहे. यासोबतच महावितरणच्या संबंधीत अधिकाऱ्यांनी या संस्थेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या भेटी घेऊन थकबाकीचा विषय मार्गी लावण्याची विनंती केली आहे. मात्र, त्यास प्रतिसाद मिळत नसल्याने संस्थेचा वीजपुरवठा खंडित करण्याशिवाय पर्याय उरला नसल्याचे महावितरणकडून सांगण्यत आले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.