आमिर खान आणि सनी देओल यांच्यात काय कॉमन आहे असा प्रश्न विचारल्यावर सगळेच निरूत्तर होतील. त्याचे कारण व्यक्तिमत्त्वापासून अभिनयापर्यंत त्यांच्यात कोणतीही साम्य स्थळे नाही. सनी तर आता खासदार आहे. आमिर मात्र राजकारणापासून लांब आहे.
तरीही या दोघांत एक साम्य आहे. ते म्हणजे या दोघांचे तीन चित्रपट एकाच वेळी अन एकाच दिवशी रिलीज झाले होते. दोन मोठ्या स्टारचे चित्रपट एकाच दिवशी प्रदर्शित झाले तर साहजिकच एका चित्रपटाचे नुकसान होत असते.
मात्र, आश्चर्य किंवा ज्याला चमत्कार म्हणता येऊ शकतो ती गोष्ट अशी की बॉक्स ऑफिसवर तीनदा टक्कर होऊनही या दोघांचे किंवा त्यांचे चित्रपटाचे नुकसान झाले नाही.
पहिली टक्कर झाली ती 1990 मध्ये. त्यावेळी सनीचा “घायल’ प्रदर्शित झाला. त्याचवेळी आमिरचा “दिल’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. आमिर रोमॅंटिक नायक म्हणून पहिल्या चित्रपटापासूनच ओळखला जातो.
मात्र माधुरीसोबत केलेल्या “दिल’ने त्याच्या या इमेजवर शिक्कामोर्तब केले. तर राजकुमार संतोषी यांनी दिग्दर्शित केलेल्या घायलने सनीला अँग्री यंग मॅन म्हणून एस्टॅब्लीश केले. हे दोन्ही चित्रपट चालले.
नंतर 1996 मध्ये या दोघांचा पुन्हा सामना झाला. यावेळी “घातक’ विरुद्ध “राजा हिंदुस्तानी’ असा सामना होता. पुन्हा दोन्ही चित्रपटांची जातकुळी वेगळी होती आणि त्यांच्या नायकांची इमेजही वेगळी होती.
अर्थात, घातक राजा हिंदुस्तानीच्या एक आठवडा अगोदर रिलीज झाला होता. मात्र तरीही या दोन्ही चित्रपटांना तुफान यश मिळाले. तिसरा आणि सगळ्यांत मोठा सामना सुरू झाला तो 15 जून 2001 रोजी.
या दिवशी आमिरचा “लगान’ रिलीज झाला तर सनीचा “गदर एक प्रेमकथा’ रिलीज झाला. लगानने इतिहास रचला. त्याने ऑस्करपर्यंत धडक मारली. ऑस्करच्या लायब्ररीतही स्थान पटकावले.
तर गदर हा एक प्रेमकथा असला तरी ती सनीची मारधाडवाली प्रेमकथा होती. या चित्रपटाची निर्मिती केवळ 19 कोटी रुपयांत केली होती. मात्र, 133 कोटींचा गल्ला जमवला असे म्हणतात.