पुणे – उसण्या पैशांच्या परताव्यापोटी दिलेला चेक बाऊन्स झाल्याप्रकरणात मारुती नारायण आबनावे (वय 49, रा. फुरसुंगी) यांना न्यायालयाने 12 लाख रुपये दंड सुनावला आहे. दंड न भरल्यास तीन महिने कारावास भोगावा लागणार आहे. लष्कर येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी डी. जे. पाटील यांनी हा आदेश दिला.
तक्रारदारांच्या वतीने ऍड. भाग्यश्री गुजर-मुळे यांनी बाजू मांडली. आरोपीने धनादेशाची रक्कम बुडविण्यासाठी कायद्याचा पुरेपूर गैरवापर करण्याचा प्रयत्न केल्यामुळे खटला सात वर्षे लांबला आहे. त्यामुळे रकमेच्या दुप्पट नुकसान भरपाईची मागणी त्यांनी केली. मारुती यांना आर्थिक अडचण असल्याने त्याने शेजारी राहणारे भाऊसाहेब जगन्नाथ पवार (वय 50, रा. फुरसुंगी) यांच्याकडून सहा लाख रुपये हातउसणे घेतले.
त्यावेळी त्याने कर्ज मिळताच पैसे परत करण्याचे आश्वासन दिले. मारुती हे शेजारी राहण्यास असल्याने भाऊसाहेब यांनी सहा लाख रुपये धनादेशाद्वारे त्यांना दिले. भाऊसाहेब यांनी रक्कम परत मागितली असता मारुती याने त्यांना सहा लाख रुपयांचा धनादेश दिला. मात्र तो बाऊन्स झाला. त्यामुळे, भाऊसाहेब यांनी नोटीस पाठवून पैशांची मागणी केली होती.