पुणे – राज्य शासनाने रिक्षा चालकांसाठी जाहीर केलेल्या अनुदानासंदर्भात प्रादेशिक परिवहन कार्यालयाने कार्यपद्धती जाहीर केली. संबंधितांनी http://transport.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळावर अर्ज करणे आवश्यक आहे.
करोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने परवानाधारक रिक्षाचालकांसाठी अनुदानाची घोषणा केली होती. दरम्यान, शनिवारी सायंकाळी हे पोर्टल कार्यान्वित झाले आहे, असे आरटीओने सांगितले आहे.
कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, अर्जदाराने मोबाइल क्रमांक आणि ओटीपीसह लॉग-इन करावे. त्यानंतर आधार क्रमांकाची नोंद करावी. अर्जदार स्वतः परवानाधारक असल्यास सेल्फ हा पर्याय निवडावा. तर वारसाहक्काने प्राप्त परवाना धारकाने वारसा किंवा उत्तराधिकारी हा पर्याय निवडावा. यानंतर रिक्षा क्रमांक आणि लायसन्स क्रमांकाची नोंदणी करणे आवश्यक आहे.
अर्जदार स्वतः परवानाधारक असल्यास केवळ माहिती नमूद करावी लागेल. कोणतीही कागदपत्रे अपलोड करण्याची आवश्यकता नाही. मात्र, वारसाहक्काने प्राप्त परवाना धारकाने लायसन्स नोंद करणे अनिवार्य नाही. हा अर्ज पूर्ण असल्यास संबंधिताने तो सबमिट करावा. काही प्रकरणात रिक्षाची नोंदणी रद्द करुन वाहन बदली आदेश प्राप्त करून घेतले असल्यास संबंधितांनी कार्यालयात अर्ज सादर करावा.
आधार क्रमांक नाही किंवा ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यास अडचणी येणे आदीबाबतचे अर्ज कार्यालयामध्ये द्यावेत, अशी माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. अजित शिंदे यांनी दिली.