पुणे – मागच्या वर्षीपासून हाहाकार माजवलेल्या करोना महामारीने दोन लाख बाधितांचा टप्पा गुरुवारी गाठला. गेल्या 24 तासांत 766 बाधितांचा आकडा पार झाला असून, बाधितांची आकडेवारी आता 2 लाख 462 झाली आहे.
शहरातील बाधितांची संख्या गेल्या दहा-पंधरा दिवसांपासून वाढतच चालली आहे. बुधवारी बाधितांची संख्या सातशेच्या पार गेली आणि गुरुवारी ती आणखी वाढली. तसेच गेल्या 24 तासांत सात जणांचा मृत्यू झाला असून, त्यातील तीनजण पुण्याबाहेरील आहेत. शहरात 9 मार्च 2020 रोजी पहिला रुग्ण सापडला. तेव्हापासून ते 3 सप्टेंबर 2020 या दिवशी एक लाख बाधितांचा टप्पा पार झाला.
त्यादिवशी एकूण 1 लाख 459 बाधितांची नोंद झाली होती. दरम्यान, आतापर्यंत एकूण 1 लाख 91 हजार 691 रुग्ण बरे झाले आहेत. गेल्या 24 तासांत 391 रुग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले. बाधितांमध्ये 3930 रुग्ण ऍक्टीव्ह असून, चार हजारांचा टप्पा गाठण्याची चिन्हे आहेत. त्यातील 231 रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे.
तर दिवसभरातील चार जणांसह एकूण मृतांची संख्या 4841 झाली आहे.आजपर्यंत 11 लाख 21 हजार 224 संशयित रुग्णांची स्वॅब टेस्ट करण्यात आली आहे. गुरूवारी 6,556 संशयितांची टेस्ट करण्यात आली आहे.
राज्यातही रुग्णसंख्येत वाढ
महाराष्ट्र, केरळ, पंजाब, मध्य प्रदेश, तमिळनाडू, गुजरात आणि छत्तीसगड या राज्यांत दैनंदिन रुग्ण संख्येत वाढ दिसून आल्याने सक्रिय रुग्णांची संख्याही वाढली आहे. देशात गेल्या 24 तासांत 16,738 नव्या रुग्णांची नोंद झाली. महाराष्ट्रात सर्वात जास्त म्हणजे 8,807, केरळमध्ये 4,106 तर पंजाबमध्ये 558 नव्या रुग्णांची नोंद झाली. केरळ, महाराष्ट्र, कर्नाटक, तमिळनाडू, पश्चिम बंगाल, छत्तीसगड, पंजाब, मध्य प्रदेश, गुजरात आणि जम्मू-काश्मीर (केंद्रशासित प्रदेश) मध्ये केंद्र सरकारने उच्चस्तरीय पथके तैनात केली असून ही पथके या राज्यांमध्ये कोविडच्या वाढत्या रुग्णांची कारणे शोधून कोविड -19 नियंत्रण आणि प्रतिबंधासाठी राज्य आरोग्य विभागाला सहाय्य करणार आहेत.