नागपूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन देताना आमदार रवींद्र धंगेकर.
पुणे – शनिवारवाडा परिसरातील 100 मीटर परिघात बांधकाम करण्यास केंद्रीय पुरातत्त्व विभागाने निर्बंध घातले आहेत. त्यामुळे अनेक जुने वाडे मोडकळीस आले आहेत. याबाबत केंद्र शासनाकडे पाठपुरावा करून नागरिकांना दिलासा द्यावा. पुणे शहरातील 500 चौरस फुटांपेक्षा कमी क्षेत्र असलेल्या सदनिकांना मिळकत करातून सूट देण्यात यावी, अशी मागणी आमदार रवींद्र धंगेकर यांनी मांडली.
नागपूर येथे हिवाळी अधिवेशनात आमदार धंगेकर बुधवारी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत पुण्यातील प्रश्नांबाबत चर्चा केली. यात प्रामुख्याने रिक्षा मालक व चालकांना मोटार वाहन कायद्यानुसार योग्यता प्रमाणपत्राचे शुल्क माफ करावे. रिक्षाचालक व मालक यांच्यासाठी कल्याणकारी मंडळ स्थापन करावे. काही गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांवर चुकीचे गुन्हे दाखल झाले आहेत. ते तातडीने मागे घ्यावेत, या मागण्या आमदार धंगेकर यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांकडे केल्या. यासोबतच पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीचाही मुद्दा त्यांनी उपस्थित केला.
ड्रग्ज माफिया ललित पाटीलला अभय देणारे तत्कालीन अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर आणि एक मंत्री खुलेआम फिरत आहेत. त्यांच्यासह राज्यातील ड्रग्ज रॅकेटवर कडक कारवाई करावी, अशी मागणी धंगेकर यांनी केली.