पुणे – पुढील वर्षी लोकसभेची निवडणूक होणार आहे. त्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाकडून मतदान केंद्राची पुनर्रचना करण्यात आली आहे. पुनर्रचना करताना काही मतदान केंद्रांच्या नावांमध्ये बदल करण्यात आला आहे. तर काही मतदान केंद्रे तळमजल्यावर स्थलांतरित करण्यात आली आहेत. तर काही मतदान केंद्रांवरील मतदारांची संख्या 1 हजार 500 पेक्षा जास्त झाल्याने त्यातील काही मतदारांना शेजारच्या खोलीतील केंद्रामध्ये स्थलांतरित करण्यात आले आहे.
जिल्ह्यात 21 विधानसभा मतदारसंघ असून एकूण 8 हजार 175 मतदान केंद्र असून या मतदान केंद्रांची माहिती तहसीलदार कार्यालय, प्रांताधिकारी कार्यालयात आणि निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात प्रसिद्ध करण्यात आली. यावर येत्या दि.9 ऑक्टोंबरपर्यंत हरकती अथवा सूचना नोंदविता येणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनेनुसार उपक्रम जिल्हा प्रशासनाने हाती घेतला. मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण व प्रमाणीकरण, विभाग, भाग यांची आवश्यकतेनुसार नव्याने मांडणी करून मतदान केंद्रांच्या यादीस मान्यता घेणे सध्या सुरू आहे.
त्यानुसार 21 विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी यांनी मतदान केंद्रांचा प्रस्तावित बदल जिल्हा प्रशासनाकडे सादर केला. या प्रस्तावित मतदान केंद्रांची यादी प्रसिद्ध करण्यात आली. राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी जिल्ह्यातील मतदार नोंदणी अधिकारी व सहायक मतदार नोंदणी अधिकारी यांच्याशी संपर्क करून आपल्या मार्गदर्शक सूचना मांडाव्यात, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.
प्रारुप मतदार यादी 5 जानेवारीपर्यंत
विधानसभा मतदारसंघनिहाय जिल्ह्याची प्रारुप मतदार यादी येत्या दि.27 ऑक्टोंबर 2023 रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे. त्या अनुषंगाने दावे व हरकती दि.27 ऑक्टोबर ते दि.9 डिसेंबरपर्यंत दाखल करता येणार आहे. तर मतदार यादीची अंतिम प्रसिद्धी दि.5 जानेवारी 2024 रोजी करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली.