पुणे- शहरात गेल्या पाच दिवसांत एकूण 64 हजार 597 गणेशमूर्तींचे पर्यावरणपूरक पद्धतीने विसर्जन झाले. तर 70 हजार 163 किलो निर्माल्य गोळा झाले आहे. आतापर्यंत शहरात सुमारे 47 टन अमोनियम बायोकार्बोनेटचे वितरण महापालिकेकडून करण्यात आले आहे.
पुणेकरांनी महापालिकेच्या आवाहनाला यंदाही प्रतिसाद देत घरच्या घरी गणेशमूर्तीचे विसर्जन करण्यासह, निर्माल्य नदीत न टाकता पालिकेच्या संकलन केंद्रावर दिले जात आहे. दरम्यान, गणेशोत्सवाच्या पाचव्या दिवशी सर्वाधिक महापालिकेच्या संकलन केंद्रावर व फिरत्या हौदामध्ये 58 हजार 596 मूर्तींचे विसर्जन करण्यात आले.
महापालिकेकडून शहरात यंदा स्थिर विसर्जन घाट उभारण्यात आलेले नाहीत. तसेच नदीकाठ आणि कालव्यातही गणेशमूर्ती विसर्जनास बंदी आहे. पर्याय म्हणून फिरते विसर्जन हौद व मूर्ती संकलन केंद्र तयार करण्यात आले आहेत. शहरात घनकचरा विभागाचे 55 व क्षेत्रीय कार्यालयांचे 64 फिरते हौद होते. तर 33 नगरसेवकांनी स्वतःचे फिरते हौद उपलब्ध करून दिले होते. दीड दिवसांच्या विसर्जनाला पुणेकरांची गैरसोय झाली असली, तरी पाचव्या दिवसाच्या गणेशमूर्ती विसर्जनास या हौदांची मोठी मदत झाली आहे. या दिवसाचे फिरत्या विसर्जन हौदाचे नियोजन प्रशासनाकडून सोशल मीडियावर व्हारयल करण्यात आले होते.
काही नगरसेवकांचा निरुत्साह
महापालिका प्रशासनाच्या 60 फिरत्या विसर्जन हौदांसह नगरसेवकांचे 33 फिरते हौद होते. यामध्ये येरवडा- कळस क्षेत्रीय कार्यालयात 1 हौद होता. शिवाजीनगर 4, सिंहगड रस्ता 4, वानवडी-रामटेकडी 12 आणि भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयात 9 हौद होते. त्यामुळे नागरिकांची सोय झाली. उर्वरित 9 क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीतील एकाही नगरसेवकाने फिरता हौद दिलेला नाही. त्यामुळे नागरिकांना महापालिकेच्या विसर्जन हौदांची वाट पाहवी लागली.